आगामी पुस्तकांमध्ये लेख लिहिण्यासाठी आवाहन

मित्रांनो नमस्कार,

आपण माझ्या या आधी संपादित केलेल्या ‘नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य’, ‘साहित्यास्वाद’ व ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी: आशय, स्वरूप आणि प्रवाह’ या पुस्तकांमध्ये अभ्यासपूर्ण लेख लिहून जे सहकार्य केले, त्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. ही पुस्तकं नेट, सेट, पेट, बीए, एम.ए.चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक, संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त ठरत आहेत.
आता यानंतर मी ‘एकविसाव्या शतकातील मराठी कथा’, ‘एकविसाव्या शतकातील मराठी नाटक’, एकविसाव्या शतकातील मराठी कविता’ असे तीन स्वतंत्र ग्रंथ संपादित करण्याचे योजिले आहे. या आधीच्या

पुस्तकांप्रमाणे यावेळेस देखील आपण अभ्यासपूर्ण लेख पाठवून मला सहकार्य करणार ही खात्री आहे.
         सन २०००पासून एकविसावे शतक सुरू झालेले आहे. हे शतक सुरू झाले तेव्हा खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरणाला एक दशक लोटलेले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. भांडवलदार, नवसाम्राज्यवाद, धार्मिक-जातीय कट्टरता वाढते आहे. त्याचे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, शहरी कामगार, तरुण वर्ग व इतर सर्व समाज यांच्यावर बरे वाईट परिणाम घडत असल्याचे दिसून येत आहे. याचे चित्रण एकविसाव्या शतकातील कथा, कविता व नाटक या साहित्यप्रकारांमध्ये कसे व कितपत होत आहे, हे शोधणे गरजेचे आहे.
          या ग्रंथांच्या संपादनामागील उद्देश हा आहे की, तो लेख वाचल्यानंतर त्या साहित्यकृतीत लेखकाने नेमके काय मांडले आहे किंवा कथा/ कविता/ नाटक या साहित्य प्रकारांमध्ये कोणते लेखक काय मांडत आहेत ते वाचकांना कमी वेळेत कळावे. त्याचप्रमाणे त्यांची उत्कंठा जागृत होऊन त्यांना मूळ साहित्यकृती वाचायची इच्छा झाली तर उत्तमच. अशा पद्धतीने २००० ते आतापर्यंतच्या कथासंग्रह/ कथाकार, नाटकं/ नाटककार, कवितासंग्रह/ कवी यांचा परिचय असलेला लेखसंग्रह आपण तीन स्वतंत्र पुस्तकांच्या रूपाने संपादित करणार आहोत. हे ग्रंथदेखील मराठी विषयाचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक व प्राध्यापकांना नक्की उपयुक्त ठरतील.

अभ्यासकांसाठी काही सूचना :
दखलपात्र व उत्कृष्ट साहित्यकृतींचीच लेखासाठी निवड करावी.
त्या लेखकाने एकापेक्षा अधिक कवितासंग्रह/ कथासंग्रह/ नाटकं लिहिले असतील तर अभ्यासकाने शक्य असल्यास त्या सर्वांचा अभ्यास करून लेख लिहावा किंवा मग इतर साहित्यकृतींचा उल्लेख करून फक्त एका साहित्यकृतीचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण लेख लिहावा.
तीन स्वतंत्र ग्रंथ असल्याने तुम्ही तीन स्वतंत्र लेख पाठवू शकता.
लेखात योग्य ते संदर्भ दिलेले असावेत. कृपया इतर अभ्यासकांच्या लेखातील, पुस्तकांतील मजकूर जसाच्या तसा आपल्या लेखात समाविष्ट करू नये. थोडक्यात कॉपीराईटच्या कायद्याचे पालन करावे.
लेख युनिकोडमध्ये मुद्रित करून पाठवावा.
लेख पाठवताना दोन तीनदा वाचून स्वतः तपासून घ्यावा. प्रमाणलेखनाच्या नियमांचे पालन करून स्वतः शक्य होईल तेवढे मुद्रितशोधन करून घ्यावे.
लेख १५००-३००० शब्दांमध्ये असावा.
ग्रंथ राष्ट्रीय स्तरावरील प्रकाशकाकडून प्रकाशकाकडून प्रकाशित केले जातील व त्यांना ISBN क्रमांक असेल.
अभ्यासकाला पुस्तकाची प्रत विकत घ्यावी लागेल. अर्थात किंमतीत सवलत दिली जाईल.
लेख लिहून पाठविण्याची शेवटची मुदत : ३१ जून २०२६.

आपला लेख patilrahulb14@gmail.com या मेलवर पाठवावा.

तरी आपण आगामी पुस्तकांसाठी लेख पाठवावेत, ही विनंती.


दि. ०९/०३/२०२६

डॉ. राहुल पाटील (संपादक) – 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *