आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक
जीवनात छोट्या छोट्या असंख्य समस्या निर्माण होतात. समाजात एक खोटा इतिहास बिंबवला जातो. जसे ह्या रंगांचे महत्त्व अमुक-तमुक धर्मग्रंथात वर्णन केले आहे, असे बिनधास्तपणे खोटे ढापले जाते. एक प्रकारचे खोटे विज्ञान लोकांसमोर मांडले जाते. त्यामुळे आपल्या समाजापर्यंत खरा इतिहास, खरे विज्ञान पोहचत नाही.
अमळनेरचे उदाहरण आपणास माहीत असेल. २००१-०२ साली मंगळग्रह मंदिराची नुकतीच उभारणी होत होती. तिथे कुत्रे-मांजरे-डुकरे फिरायचे. आता तिथे ‘अतिप्राचीन…’ असे म्हटलेले आहे व लोकही विश्वास ठेवतात.
अतिशय अचूक, नेमके, तार्किक, स्पष्ट, निःसंदिग्ध, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेले विचार असलेला समाज निर्माण करण्यात अशा गोष्टी बाधा ठरत आहेत, हेच मला म्हणायचे आहे.
बाकी देव मानण्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. पण कोणती प्रथा, कोणता देव केव्हा निर्माण झाला, हे माहीत करून घ्यायला हवे. जसे १८५० च्या आधी भारतात सत्यनारायण पूजा नव्हती. पण आता गृहप्रवेश, लग्नानंतर तो केलाच जातो. श्रद्धेचा भाग आहे. तसेच नाही केला तर काहीतरी अघटित घडण्याची भीतीही चांगल्या-चांगल्या सुशिक्षितांना वाटत राहते. तेव्हा असा भीतीवर आधारलेला समाज काही उपयोगाचा नाही.
तसेच त्या प्रथा परंपरा व देवाधर्माच्या नावाने समाजातील बहुजन समाजाचे शोषण होणार नाही, समाजाची बुद्धी कुंठित होणार नाही, देवाधर्माचा आधार राजकारणी, भांडवलदार, व्यापारी घेणार नाहीत, यासाठी त्यांची चिकित्सा करत राहणे गरजेचे असते.
सतीप्रथा, केशवपन, विधवाविवाह बंदी या सर्वांच्या मुळाशी धार्मिक श्रद्धाच होत्या व या श्रद्धांचा आधार धर्मग्रंथ होते (जरी त्यात ते प्रत्यक्ष लिहिलेले नसले तरी) आणि या धर्मग्रंथाचे निर्माते परमेश्वर मानले गेले आहेत. म्हणून या प्रथा अपरिवर्तनीय मानल्या गेल्या होत्या.
थोडक्यात,
निव्वळ श्रद्धा या अतार्किक, स्थळ-काळ-व्यक्तीसापेक्ष असतात व हा प्रश्न गहन-बिहन काही नाहीये. समाजात शिक्षण व्यवस्थित रुजले, संशोधक वृत्ती वाढली की आपोआप श्रद्धांचे जाळे विरत जाते.
असो.
© डॉ. राहुल पाटील
फेसबुकवर माझ्या वरील पोस्टवर
Sandipkumar Salunkhe सर (IRS OFFICER) यांचे माझ्या नवरात्रचे नऊ रंग कसे निर्माण झाले. या पोस्टवरील चर्चेवरील वाचनीय व चिंतनीय प्रतिक्रिया-
डॉ.राहुल पाटील अगदी योग्य विचार. आनंदासाठी निर्माण झालेल्या गोष्टींचा संबंध देवधर्म, पाप पुण्य यांच्याशी जोडला की त्यातून भीती निर्माण होते. ज्यांना अशा भीतीचा प्रॉब्लेम नसतो ते फक्त आनंद घेतात. परंतु समाजात अनेक अशा व्यक्ती असतात की त्यांच्या मनात सतत काहीतरी अघटीत घडण्याची भीती असते. शिवाय कुटुंब, मुले बाळे यांचे चांगले व्हावे असे त्यांच्या सुप्त मनात सतत सुरू असते त्यातून अशा व्यक्ती हळूहळू या प्रथांना बळी पडून केवळ आनंदासाठी नव्हे तर भीतीचा भाग म्हणून अशा गोष्टी करायला लागतात. शिवाय आपल्यावर एखाद्या संकट आले तर अमुक एक गोष्ट केली नाही म्हणून हे संकट आले असेही विचार मनात घोळत राहतात. याला आपण सुद्धा अपवाद नाही. कारण शेवटी मानवी आयुष्यच मुळात नश्वर असल्याने कुठेतरी एक सुप्त भीती असतेच. अशा भीतीचाच व्यापार होतो. शिवाय आपल्यासारख्या भारतीय समाजात जिथे अत्यंतिक विषमता आहे तिथे आर्थिक उतरंडीमध्ये खाली असणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशा प्रथांना बळी पडून शोषणाचे साधन बनण्याची शक्यता असते. उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय यांच्या आर्थिक गरजा पूर्ण झालेल्या असल्याने ते विरंगुळा म्हणून किंवा आपल्या आनंदासाठी अशा अनेक नवनवीन गोष्टींचा, प्रथांचा शोध लावतात मात्र मानसिक बळी नीच्च आर्थिक स्तरावरील जनतेचा जातो. असो. सध्याच्या धार्मिक उन्मादाच्या वातावरणात असे विचार कुणाला फारसे पटणार नाहीत. पण तरीही विचार मांडत राहिले पाहिजेत. मुळात हेच विचार तुकाराम महाराज आणि जवळ जवळ सर्व संतांनी आधीच मांडले आहेत पण सध्या त्यांनाही किंमत नाही. कालाय तस्मै नमः.(हे सर्व केवळ साडी या विषयाशी संबंधित नाहीत. ते केवळ निमित्त)