बरं झालं, आपण विज्ञानयुगात जन्माला आलो! कोरोना कशापासून होत आहे, त्याच्यापासून संरक्षण कसे करावे, आजार झालाच तर तर काय करावे हे तरी
कळतंय. अन्यथा आधी आषाढात नुसत्या हगवणीनेच यापेक्षा जास्त लोकं मरायचे.
१८९६-९७ च्या प्लेगमध्ये भारतात १ कोटीहून जास्त लोकं मेलीत. त्यावेळी भारताची लोकसंख्या २५- ३० कोटी होती. त्या हिशेबाने आज किमान ५ कोटी माणसं मेली असती.
आणि जर आज आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या संख्येने माणसं मेली असती तर किती भयंकर परिस्थिती राहिली असती, याची कल्पना तर करून बघा!
सहाव्या व सोळाव्या शतकात युरोपात प्लेगने निम्मे लोकं मेलीत. आधी पाप वाढलं की अशा साथी येतात, असे समजायचे. आज आपल्याला कमीत कमी हे तरी कळतंय की साथी कशामुळे येतात.
आपल्या देशात जेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती, तेव्हा एखाद्या भागात दुष्काळ पडला तर त्या भागांमध्ये अन्नधान्य पोहोचवणे शक्य व्हायचे नाही. तेव्हा अन्नाअभावी उपासमारीने अक्षरशः लाखो लोकं मरायची. माणसांचे सांगाडे होऊन माणसं जागेवर संपून जायची. आज विज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या रेल्वे, ट्रक, इतर वाहने यामुळे कुठेही अन्नधान्याचा हवा तेवढा पुरवठा करता येतो. हे विज्ञानामुळे शक्य झाले आहे.
कोणत्याही युगात माणसाच्या रक्षणासाठी देव आलेला नाहीये. इथे माणसानेच माणसाला संकटांतून बाहेर काढले आहे, हे वास्तव जेवढ्या लवकर बहुतांश लोकं मान्य करतील, तेवढे मानवजातीला यापेक्षा चांगले दिवस देतील.
म्हणून म्हणतो, बरं झालं आपण विज्ञान युगात जन्माला आलोत. त्याबद्दल शास्त्रज्ञांचे आभार माना व किमान वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा. अनेक समस्या आपोआप सुटतील.
© डॉ. राहुल रजनी