विवाहपूर्व समुपदेशन

मी राष्ट्रीय सेवा योजना विभागात (NSS) जून २०१२ ते ऑक्टोबर २०१८ अशी साडे सहा वर्ष कार्यक्रम अधिकारी (Program Officer) म्हणून काम केलेले आहे. या काळात महाविद्यालयाचे ६ तर एक राज्यस्तरीय व एक जिल्हास्तरीय  असे ७-७ दिवसांचे ८ श्रमदान शिबिर आयोजित करण्याची संधी मला मिळाली. आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात ३०० विद्यार्थी असल्याने आमच्याकडे ३ कार्यक्रम अधिकारी असतात. या श्रमदान शिबिरांमध्ये व्याख्यानाच्या सत्रांमध्ये आम्ही या काळात ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करायचो. मुलांसाठी पुरुष डॉक्टर तर मुलींसाठी स्त्री डॉक्टर असे एकाच वेळी वेगवेगळे मार्गदर्शनपर सत्र आम्ही घ्यायचो. जव्हारच्या सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रामदास मराड हे अतिशय सोप्या भाषेतून मुलांच्या शंकांचे निरसन करायचे. त्यांच्यासोबत दरवर्षी वेगवेगळ्या महिला डॉक्टर असायच्या. त्या मुलींना वेगळ्या खोलीत मार्गदर्शन करायच्या. सुरुवातीला मुलं व मुली

अशा सर्वांना सांगता येईल असे काही बाबतीत डॉक्टर माहिती द्यायचे. त्यानंतर मुलं व मुली यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व्हायचे. व्याख्यान कुठले, मुलांच्या प्रश्नांवरच दोन तास उत्तरे द्यावी लागायची! सुरुवातीला मुलं थोडी लाजायची. म्हणून ते तोंडी प्रश्न विचारायचे नाहीत. मग आम्ही त्यांना कागदावर लिहून प्रश्न विचारायला प्रवृत्त करायचो. मग मात्र इतके प्रश्न लिहून यायचे की, खूप साऱ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत दोन-अडीच तास केव्हा व्हायचे, तेही कळायचे नाही. पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या मुलांना सुद्धा हस्तमैथुन, स्वप्नदोष, गुप्तरोग या व इतर साध्या-साध्या गोष्टी माहित नसतात, हे मला तेव्हा कळले. त्यात मुलांना मी त्यांना काही प्रमाणात ‘या बाबतीतील स्त्री पुरुष दोघांचा सारखा सहभाग म्हणजे समागम (सम+आगम) किंवा संभोग (सम+भोग)’ या संकल्पना समजावून सांगायचो. वैवाहिक व विवाहपूर्व जीवनात स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे, हे किती महत्वाचे आहे, हेही सांगायचो. ७ दिवसात १२ सत्र व्हायचे. त्या सर्व सत्रांमध्ये सर्वात यशस्वी व चांगले सत्र हेच व्हायचे, त्याला कारण म्हणजे या विषयातील युवकांचे अज्ञान व प्रचंड कुतूहल, परंतु ते शमविणाऱ्या जवळच्या विश्वासार्ह्य व्यक्तींचा व माध्यमांचा अभाव. या विषयावर शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना, मुलांना नेमकी व अचूक माहिती दिली नाही, तर ते गुगल, युट्युब अशा माध्यमातून ते शोधतात. त्यातून योग्य व बरोबर माहिती मिळेलच याची खात्री नसते. म्हणून मला असे वाटते की, हा प्रयोग म्हणजेच अशी मार्गदर्शनपर व्याख्याने अकरावीपासून पुढे पदवी व पदव्युत्तर स्तरापर्यंत सातत्याने व्हायला हवीत. याच उद्देशाने आम्ही सदर मार्गदर्शन न चुकता आयोजित करायचो.

– डॉ. राहुल रजनी,

सहाय्यक प्राध्यापक,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *