समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना
समकालीन हा कालवाचक शब्द आहे. ‘सम’ म्हणजे समान, समांतर, सोबत. जे साहित्य आपल्या काळाबरोबर, काळासोबत असते, त्या काळाच्या समांतर असते. ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळातील समाजाचे
प्रतिबिंब त्यात पडलेले असते. त्या काळात ज्या घटना घडत असतात, ज्या विचारप्रणाल्या प्रभावी असतात, त्या काळातील समाजातील लोकांची मानसिकता, जाणिवा, मते तयार झालेली असतात, त्यांचे चित्रण ज्या साहित्यात घडते, त्याला ‘समकालीन साहित्य’ असे म्हणता येईल.
एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये काहीएक प्रमाणात समान, समान जाणिवा, समान अनुभव, समान प्रेरणास्त्रोत, समान भाषावैशिष्ट्ये, समान मूल्यांचा पुरस्कार करणारे, समान जीवनदृष्टी असलेले साहित्य निर्माण होऊ लागते. अनेक लेखक त्यात संख्यात्मकदृष्ट्या भर घालतात, तेव्हा त्या साहित्याचा प्रवाह निर्माण होतो.
१९६० नंतरच्या कालखंडामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य असे साहित्याचे प्रवाह निर्माण झाले.
१९४५ नंतर मराठी साहित्यात नवसाहित्याचा उदय झाला. या नंतरच्या कालखंडामध्ये कविता, कथा, कादंबरी इत्यादी साहित्यांच्या प्रकारांमध्ये प्रयोगशीलता, भाषेचा-प्रतिमांचा सूचक वापर, कथानक-निवेदन-भाषा-घाट-तंत्राच्या ठराविक साच्यातून मुक्त, मानवी मनाच्या गुंतागुंतीचे चित्रण इत्यादी वैशिष्ट्ये विशेषकरून दिसून येऊ लागले. हे साहित्य काही प्रमाणात आपल्या समकाळातील वास्तव जीवन मांडणारे साहित्य होते. दुसऱ्या महायुद्धातील भीषण विध्वंस, जीवित हानी, मानवी मूल्यांचा जाणवलेला फोलपणा, ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका इत्यादींचा तत्कालीन प्रतिभावंत व संवेदनशील लेखकांवर जो परिणाम घडून आलेला होता, त्यातून हे साहित्य निर्माण झाले आहे. या साहित्यालाही समकालीन साहित्य म्हटले जाते.
१९६० नंतरचे साहित्य खऱ्या अर्थाने समकालीन साहित्य मानले जाते. साठोत्तरी कालखंडात जे दलित, स्त्रीवादी, ग्रामीण साहित्यप्रवाह निर्माण झाले, ते आपल्या काळाशी आणि त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी जवळचे नाते सांगतात. दलित साहित्य प्रवाहामध्ये आपल्याला त्या कालखंडातील दलितांवर होणारे अन्याय, त्यांना पशुपातळीवरची मिळणारी वागणूक, गावगाड्यात जातिव्यवस्थेमुळे त्यांचे असलेले खालच्या पातळीवरील स्थान, शिक्षणामुळे-बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्य यामुळे त्यांच्यात निर्माण होत गेलेले आत्मभान, विद्रोह यांचे चित्रण आलेले आहे.
ग्रामीण साहित्यप्रवाह अंतर्गत ज्या कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला साठोत्तरी कालखंडातील ग्रामीण भागातील शेतकरी, बारा बलुतेदार यांचे दारिद्र्य, त्यांच्यातील सामाजिक, आर्थिक पातळीवरील परस्परावलंबित्व, कृषिव्यवस्थेत कालानुसार होत गेलेले बदल, राजकारण-सहकार-शिक्षण यामुळे ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय व आर्थिक पातळीवर झालेली परिवर्तने इत्यादीचे वास्तव चित्रण आलेले आहे.
तर स्त्रीवादी साहित्यात पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीच्या वाट्याला आलेले दुय्यम स्थान, कौटुंबिक व सामाजिक पातळीवर तिच्यावर होणारे अन्याय, ‘चूल व मूल’ एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले त्यांचे विश्व, शिक्षित-उच्चशिक्षित-नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आलेले त्यांच्या स्वत्वाचे भान, स्त्रियांचे उभ्या राहिलेल्या चळवळी इत्यादीचे चित्रण आपल्याला स्त्रीवादी साहित्यात बघायला मिळते.
तत्कालीन समाजाचे वास्तव चित्रण या साहित्यप्रवाहांमध्ये आलेले असल्यामुळे हे साहित्यप्रवाह समकालीन साहित्यप्रवाह ठरतात.
© Copyright
डॉ. राहुल रजनी
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw