३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत
एक सत्र झाले. या सत्रात त्यांनी शिक्षकांनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातील ठळक मुद्दे पुढील पुढीलप्रमाणे-
डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणातील व नंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील काही ठळक मुद्दे-
१) आपल्या ecosystem मध्ये असे वातावरण तयार व्हायला हवे, ज्यामुळे विज्ञानाचा प्रचार प्रसार झपाट्याने होईल. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाच्या मागे राहणे, हे आपल्याला परवडण्यासारखे नाही, आपण आपल्या नागरिकांना या बाबतीत सक्षम करायला हवे.
२) डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा संशोधन, अभ्यास, पुरावे व वैज्ञानिक निकषांवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याला आव्हान द्यायचे असेल तर ते वैज्ञानिक पद्धतीनेच द्यायला हवे. पण ताे सिद्धांत दृढ होईल, असे पुरावे आजही सापडतात. या सिद्धांतावरून निर्माण झालेला वाद हा अनाठायी व चुकीचा होता.
३) गणपती दूध प्याला, त्यावेळेस मी माझ्या सहकारी शास्त्रज्ञ मित्रांसोबत होता. त्यांनीही यावर विश्वास ठेवला होता. तेव्हा मी वेगळा प्रयोग करून गणपतीच काय कुकरही दूध पिऊ शिकतो, हे प्रयोगांती सिद्ध करून ही अफवा कशी चुकीची आहे, हे पटवून दिले होते. यावरून शास्त्रज्ञांमध्येही अंधश्रद्धा असतात. तसेच ग्रहांचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो, मंगळग्रह वगैरे खोटं आहे.
४) (मी विचारलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार व विज्ञानाचा प्रचार यातील फरक काय? या प्रश्नाला उत्तर देताना काकोडकर सर म्हणाले-) वैज्ञानिक दृष्टिकोन ही मानसिक वृत्ती आहे. तर विज्ञानाचा प्रचार म्हणजे त्यावर आधारलेल्या वस्तू व साधनांचा वापर वाढणे. वैज्ञानिक दृष्टिकोणाची खूप गरज आहे. राज्यघटनेतसुद्धा तसे नमूद केलेले आहे. पण आपण तो खरोखर बाळगतो का? तर नाही. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे.
५) उर्जेचा वापर पाच पटीने तरी वाढायला हवा.
६) पुढील काळात अणुउर्जा व सौरउर्जेशिवाय पर्याय नाही.
७) Electric car व वाहने ही प्रदुषण कमी करण्याच्या व खनिज तेलाची आयात कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.
८) विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन आपण खेड्यात राहूनही मोठमोठ्या कंपन्यांना त्यांना लागणारे पार्ट, वस्तू पुरवून भरपूर पैसे कमवू शकतो.
९) काकोडकरांना एकाने प्रश्न विचारला का, “आकाशातल्या ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो का?” तेव्हा त्यांना मंचावर बसलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांना उत्तर द्यायला सांगितले. त्यांनी दिलेले उत्तर- मुळात विश्वाच्या, आपल्या आकाशगंगेच्या पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व म्हणजे नगण्य आहे. तेव्हा त्यांना आपल्यासारख्या क्षुद्र जीवांच्या जीवनात रस (interest) तो काय राहणार. ग्रहांचा आपल्या जीवनावर बिलकूलही प्रभाव पडत नाही, पडलाच तर मनातील निग्रह, विग्रह, आग्रह, दुराग्रह, पूर्वग्रह या ग्रहांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. तेव्हा या पद्धतीने ग्रहशांती व इतर गोष्टी सपशेल खोट्या आहेत. मानवी प्रयत्नानेच त्याला सर्वकाही मिळत असतं. काकोडकरांनीही या उत्तराचे समर्थन केले.
– डॉ. राहुल पाटील