मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)

कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,

संकेतस्थळे यांचा वापर करून घेतला तर ते काम न कंटाळता, अतिशय वेगाने व वेळेत पूर्ण करता येते. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही ॲप्स व इतर साधनांचा परिचय करून घेणार आहोत.

१) vflat ॲप – आपल्याला बऱ्याचदा एखादे पुस्तक, पुस्तकातील काही भाग, पत्र, एखादे परिपत्रक किंवा कोणत्याही स्वरूपाचा छापील मजकूर ज्याचा आपल्याशी संबंध आहे, ज्याचा आपल्याला एखाद्या लेखात, पत्रात समावेश करायचा आहे, तो टाईप करावा लागतो. समोर छापील मजकूर आहे व तो टाईप करावे लागणे, हे खूपच कंटाळवाणे व वैताग आणणारे काम असते. अशा वेळेस vflat या ॲपच्या मदतीने आपण त्याचा फोटो काढून त्याला जसेच्या तसे textमध्ये रूपांतरित करू शकतो. अलीकडे तर हाताने लिहिलेला मजकूरसुद्धा या ॲपच्या मदतीने textमध्ये रूपांतरित करता यायला लागला आहे. या textमध्ये मग आपण हवा तसा बदल करून आपले काम अगदी सहज पूर्ण करू शकतो. एका छापील पानाचे textमध्ये रूपांतर करण्यासाठी फक्त एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. मग आहे की नाही वेळेची व श्रमाची बचत! मात्र ही ॲप वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. ही ॲप वापरायला अतिशय सहज व सोपी आहे.

२) शुद्धलेखन ठेवा खिशात ॲप – ही ॲप प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण मराठी भाषेतून आपल्या मनातील विचार, भावना लिहून ठेवत असतो. पेपर, पत्र, अर्ज लिहित असतो. फेसबुक, व्हाट्सअपवर मेसेज लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करतो. पण शुद्ध किंवा प्रमाण लेखनाचे किचकट नियम आपल्याला पाठ नसतात, माहित नसतात. कोणता शब्द ऱ्हस्व व दीर्घ लिहायचा, रफार कोणत्या अक्षरावर द्यायचा, एखाद्या शब्दाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागले तर त्याच्या रूपात कोणता बदल होतो, हे आपल्याला माहीत नसते. मग आपले लेखन प्रमाण भाषेच्या नियमानुसार होत नाही. आपण लिहिलेल्या मजकुरावरून आपल्याला ती भाषा किती अवगत आहे, त्या भाषेचे आपल्याला किती ज्ञान आहे, हे समोरच्याच्या लक्षात येते. तेव्हा अशा वेळी ही ॲप आपल्या कामात येते. ही ॲप इन्स्टॉल करून ओपन केली की तिथे एका भिंगाचे चित्र येऊन ‘शब्द लिहायला सुरुवात करा’, असे लिहिलेले दिसते. तिथे आपल्याला हवा तो शब्द टाकून आपण त्याचे प्रमाण लेखनानुसार असलेले रूप तसेच प्रत्यय अथवा शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर होणारे सामान्यरूप जाणून घेऊ शकतो. या ॲपवर आडव्या निळ्या पट्टीवर काही चिन्हे आहेत. त्यात गोल वर्तुळात i या चिन्हावर क्लिक केल्यास कोशात वापरलेल्या संक्षेपांचे आणि खुणांचे अर्थ दिलेले आहेत. गोल वर्तुळात ? या चिन्हावर क्लिक केल्यास कोश कसा पाहावा हे जाणून घेता येते. त्या संदर्भात काही उपयुक्त सूचना दिलेल्या आहेत. एका चौकोनात आडव्या तीन रेषा असलेले चिन्ह आहे. या चिन्हावर टिचकी मारून बघितल्यास मराठी शुद्धलेखनाचे सर्व नियम दिलेले आहेत. 1, 2, 3 हे अंक व त्यापुढे आडव्या रेषा असलेल्या चिन्हावर टिचकी मारल्यास मराठी भाषेतील, देवनागरी लिपीतील अंक अक्षरी स्वरूपात दिलेले आहेत. बरेच जण अनेक अंक अक्षरी लिहिताना चुका करतात. त्यांचे प्रमाणरूप इथे बघता येते.

३) google indic keyboard – आजच्या काळात मोबाईल, संगणक, लॅपटॉप यावर मराठी अथवा कोणत्याही भाषेत सहज टाईप करता येणे, ही सामान्य गोष्ट झालेली आहे. मात्र अजूनही कित्येक जण मराठी भाषेत लिहिण्यासाठी देवनागरीऐवजी रोमन लिपीचा वापर करतात. बऱ्याचशा शब्दांच्या स्पेलिंग चुकलेल्या असतात.ते व्यवस्थित वाचता येत नाही. तेव्हा मराठी, हिंदी यासाठी देवनागरी लिपीचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲप उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा वापर करून टाईप करणे अतिशय अवघड असते. तेव्हा google indic keyboard ही ॲप या कामासाठी अतिशय उपयुक्त व वापरकर्त्यांना अनुकूल (यूजर फ्रेंडली) आहे. यावर तुम्हाला रोमन व देवनागरी लिपी सहज बदलता येतात.

ही ॲप google play store वर उपलब्ध न झाल्यास google search engineवरून install करू शकता किंवा एखाद्याच्या मोबाईलमध्ये असेल तर त्याच्याकडून घेऊ शकता. ही ॲप एकदा इन्स्टॉल केल्यावर व्हाट्सअप, फेसबुक, नोट्स, मेल, docs अशा कोणत्याही ठिकाणी आपण टाईप करू शकतो. टाईप करताना आपल्या समोर जो कीबोर्ड ओपन होतो, त्यावर आपल्याला रोमन व देवनागरी लिप्या सहज बदलवता येतात. वर abcवर क्लिक केल्यावर रोमन व ‘ळ’वर क्लिक केल्यावर देवनागरी लिपी वापरता येते. ‘ळ’वर पुन्हा क्लिक केल्यावर ‘liha-लिहा’ व ‘लिहा’ असे दोन पर्याय येतात. त्यापैकी ‘liha-लिहा’वर रोमन अक्षरांवर क्लिक करून सहज देवनागरीत टाईप करता येते. उदा. ‘bharat’ टाईप केल्यास ‘भारत’ शब्द टाईप होतो. असे अगदी सहज, सोप्या पद्धतीने आपण नेहमी टाईप करू शकतो. या ॲपचे कीबोर्ड व कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपच्या कीबोर्डवरील key यांचा क्रम, रचना, मांडणी अगदी सारखी असल्याने आपल्याला एकीकडे कमावलेल्या टायपिंगच्या वेगाचा दुसरीकडे उपयोग होतो. 

काही किचकट शब्द असल्यास ‘ळ’वर दोनदा क्लिक करून ‘लिहा’ हा पर्याय निवडून फक्त तेवढा शब्द टाईप करून घ्यावा व पुन्हा ‘liha- लिहा’वर जाऊन आपले नेहमीचे टाईप करत राहावे.

कीबोर्डच्या खाली डाव्या बाजूला ?123वर क्लिक केल्यास देवनागरी लिपीतील ०१२३..९ हे अंक आपल्याला वापरता येतात. त्यासोबत कीबोर्डच्या उजव्या बाजूला वर माईकचे चिन्ह असते. त्यावर क्लिक करून मराठी भाषेची सेटिंग करून आपण बोलून टाईप करू शकतो. बोलून टाईप केल्याने आपले टायपिंगचे काम अतिशय वेगाने होते. यानंतर त्या मजकुरात फक्त विरामचिन्हे टाकून, काही चुकलेले शब्द दुरुस्त करून घ्यायचे असतात. या पद्धतीने आपण कितीही मजकूर कमी वेळेत टंक करू शकतो. 

४) Google translate- या ॲपच्या मदतीने जगातील अनेक महत्त्वाच्या भाषांचे दुसऱ्या भाषांमध्ये भाषांतर करता येते. भाषांतरित झालेला मजकूर कॉपी करता येतो, ऐकता येतो, पानांचे फोटो काढून त्यांचे भाषांतर करता येते. तसेच मोबाईलवर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून आलेले फोटोही या ॲपच्या खाली उजव्या बाजूला कॅमेरावर क्लिक केल्यावर त्यांचे भाषांतर करता येते. व्हॉट्सअप किंवा एखाद्या वेबसाईटवर असलेला मजकूर कॉपी करून इथे पेस्ट करूनदेखील आपल्याला त्याचे भाषांतर करता येते. या ॲपच्या मदतीने मराठी भाषेतील मजकूर इतर भाषांमध्ये व इतर भाषांमधून मजकूर मराठीत भाषांतर करता येतो. आपण इतर भाषकांशी संपर्कात राहू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो. या ॲपमुळे आंतरभाषिक संपर्क साधणे शक्य होते. आपण टाईप केलेला किंवा भाषांतरित झालेला मजकूर ऐकता येत असल्याने आपल्याला त्या शब्दाचे उच्चारण देखील कळते. यामुळे आपल्याला भाषा शिकता येऊ शकतात. या ॲपच्या मदतीने आपण फक्त शब्दांचेही भाषांतर करू शकतो. असे असले तरी झालेले भाषांतर एकदा तपासून घ्यायला हवे. काही शब्दांचे भाषांतर व्यवस्थित झालेले आहे की नाही, वाक्यरचना बरोबर आहे की नाही, हे बघणे आवश्यक असते. 

५) मराठी बृहद् कोश (संकेतस्थळ)- हे मराठी भाषेच्या सहा शब्दकोशांमधील शब्दांचा एकत्रित संग्रह असलेले संकेतस्थळ आहे. बृहद् कोश हा नवा शब्दकोश नसून हे अनेक कोशांचे एकत्रित ऑनलाइन संकलन आहे. आज या संकेतस्थळावर २,१८, ८६३ शब्दांचे अर्थ बघायला मिळतात. बृहद् कोशामध्ये एखादा शब्द शोधल्यास अनेक शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळतात. त्याबरोबर त्या शब्दाशी संबंधित इतर शब्दही मिळतात. अनेक कोश व अनेक संकेतस्थळांमध्ये विखुरलेले शब्दकोश माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बृहद् कोश प्रकल्पाद्वारे संकलित करून मराठी कोश वाङ्मयाची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या माध्यमातून केला आहे. हा बृहद् कोश सर्वकाळ मुक्त व सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक अशा सर्वांसाठी हे संकेतस्थळ अतिशय लाभदायक ठरणारे आहे. संकेतस्थळ पुढील प्रमाणे- https://bruhadkosh.org 

(टीप- यानंतर अजून काही उपयुक्त app व संकेतस्थळांची माहिती मी माझ्या ब्लॉगवर किंवा YouTube channelवर करून देईन. तेव्हा संपर्कात रहा. माझ्या युट्युब चॅनेलची लिंक पुढे दिली आहे. ज्यावर मराठी साहित्य, भाषा व व्याकरण, शिक्षण, अभ्यासाच्या पद्धती इ. विषयांवरील २५०पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत.)https://youtube.com/@marathijourney8663)

© डॉ. राहुल पाटील

3 thoughts to “मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)”

  1. खूपच उपयुक्त माहिती आणि अत्यंत सोप्या शब्दात मांडली आहे सर… कमीत कमी वेळात काम पूर्ण करताना भाषेचा दर्जा, शुद्ध लेखनाच्या पद्धती टिकवून ठेवणं हे खरं आव्हान असतं… त्यासाठी या ॲप्स च्या माध्यमातून बरीच मदत होते.. मी स्वतः काम करताना यांचा वापर करत असल्याने , तुमच्या लेखात वापरकर्त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बरोबर हेरून त्यावर उपाय काय हे देखील सांगितले आहेत.. हे जाणवले.. नेहमी प्रमाणेच माहितीचे उत्तम संकलन आणि मांडणी सर..धन्यवाद
    नम्रता कडू – 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *