नव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय

नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न

  • आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत.
  • होमो सेपियन्सना आपल्या बुद्धिमत्तेने धर्माची निवड करण्याचा आधिकार असायला हवा.
  • Man is a rational animal. जगातील सर्वच धर्मांनी बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या होमोसेपियन प्रजातीच्या व्यक्तींना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदत्त गुणांचा उपयोग करून, उपलब्ध असलेल्या धर्मातील एका धर्माची निवड करण्याचा अधिकार नाकारला आहे.
  • होमोसेपियन व्यक्तीच्या सारासारबुद्धीची दखल घेऊन, प्रत्येक व्यक्तीला सज्ञान वयाची झाल्यावर आपल्या पसंतीचा धर्म निश्चित केल्यावरच, त्या व्यक्तीस धर्माची दीक्षा देण्याची प्रथा, खरं तर सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सुरू करायला हवी होती.
  • त्याऐवजी सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सरसकटपणे व्यक्तीच्या मातापित्याचा धर्म तोच व्यक्तीचा धर्म अशी मान्यता देऊन, तशी प्रथा व परंपरा सुरू करून, व्यक्तीच्या आपल्या इच्छेने धर्म नाकारण्याचा किंवा उपलब्ध धर्मातील एक धर्म निवडायच्या अधिकारावर गदा आणली आहे.
  • बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या मानवी व्यक्तींनी, आपल्या व इतर प्रजातींच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांना मानवी रूप देण्यासाठी भूतकाळातील सर्वच धर्म व पंथ संस्थापकांकडून झालेला हा प्रमाद नाकारून, त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
  • जगातील सर्वच धर्म आपसात केवळ स्पर्धाच नव्हे तर काही प्रमाणात द्वेषही करताहेत, त्यामुळे आतापर्यंत जगभरात प्रचंड हिंसाचार घडून आलेला आहे.
  • ह्यातील कुणा एका धर्मातील वा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येऊन धर्मसंस्थापकांनी केलेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करणे, अशक्यच आहे.
  • त्यामुळे मानव प्रजातीचा विकास करण्यासाठी ईश्वर ह्या संकल्पनेच्या जालात अडकलेल्या मानव प्रजातीतील व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अनिश्वरवाद्यांना व संयुक्त राष्ट्र संघटनेलाच स्विकारावी लागणार आहे.
  • ह्यासाठी जगातील समस्त नास्तिकांनो, सुजाण नागरिकांनो, जगातील असे देश, ज्यांनी आपले राष्ट्र एका विशिष्ट धर्माचे असल्याचे नाकारले आहे, अशा रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि इतर अशा सर्व देशांनी, ह्या दिशेनं वाटचाल करावी म्हणून, त्यांना योग्य लॉजिकल कृती करण्यास, पुढचे पाऊल टाकण्यास उद्युक्त करूया.
  • ह्या देशाच्या शासनसंस्था आपापल्या देशातील धर्मसंस्थांना अशा प्रकारे सज्ञान झालेल्या व्यक्तीनांच, व्यक्तींच्या इच्छेप्रमाणे, त्यांनी निवडलेल्या धर्माची दीक्षा देण्याचा विधी विकसित करावा आणि अशा विधी झालेल्या, दीक्षाप्राप्त व्यक्तीसच आपल्या धर्मामध्ये प्रवेश देण्याची प्रथा सुरू करावी व त्याप्रमाणे योग्य नियम बनवावेत म्हणूून योग्य कायदे करतील.
  • आपल्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्वाचा हक्क देताना त्यांनी, एक तर स्वत़ःला अनिश्वरवादी घोषित करायला हवे किंवा सज्ञान झाल्यावर आपल्या इच्छेने निवडलेल्या धर्माचा विधीपूर्वक स्विकार करायला हवा, अशा रीतीचे कायदे सर्वच देश करतील, असे प्रयत्न करावेत.
  • त्याचबरोबर युनोच्या सभागृहातही युनोच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशाच्या धर्मविषयक कायद्यांत योग्य बदल करून धर्मसंस्थांना ह्या उद्देशास सहाय्यक अशा प्रकारचे नियम, विधी, माहिती विकसित करण्यास उत्तेजन द्यावे.
  • युनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी युनोच्या आमसभेत, मानव ही सर्व प्रजातीतील एक बुद्धिवान आणि सारासारविवेकबुद्धी असलेली प्रजाती आहे, म्हणून निसर्गाने बहाल केलेल्या, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या वेगळेपणाचा विकास करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे, अशा आशयाच्या भूमिकेला मान्यता देऊन, मानवाच्या विकासाला मर्यादित करणाऱ्या सर्व धर्मांमध्ये योग्य बदल करून, मानवाला मानव्याच्या दिशेने प्रवास करण्यास पूरक असे नियम करण्याविषयक आवाहन करणारा एक ठराव पारित करावा.
  • भविष्यातील मानवाने एक तर त्याचा धर्म हा तो सज्ञान झाल्यावर विचारपूर्वक निवडलेला असायला हवा किंवा निधर्मी राहण्याचा, एकापेक्षा अधिक धर्मातील चांगल्या गोष्टींचे पालन करण्याचा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.
  • म्हणून कुणाच्याही दाखल्यावर तो सज्ञान झाल्यावर स्वतःहून कायद्याप्रमाणे कोणताही एक धर्म स्वीकारेपर्यंत कोणत्याही धर्माचा उल्लेख करता कामा नये.
  • शाळा, महाविद्यालये यात कोणत्याही धर्माचे कार्यक्रम होणार नाहीत, यासाठी नियम, कायदे बनवायला हवेत व जर असे कुठे घडत असेल तर एका तक्रारीवर चौकशी व दोषी आढळल्यास कारवाई करायला हवी.
  • धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसा, दंगे इत्यादी गोष्टींवर कठोरातली कठोर कारवाई करून वरील गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही असे कायदे निर्माण करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी करायला हवी.
  • धर्माचा ठेका घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांचा कायदे करून बिमोड करायला हवा.

(दीनानाथ मनोहर यांची पोस्ट काही बदलांसह…)

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *