कथानक –
‘सांड’ ही ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय केंद्रस्थानी असतो आणि शेतीसाठी गाय, बैल यांची खूप आवश्यकता असते. सांड म्हणजे गायीचा गोर्हा. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मोकळा सोडलेला बैल किंवा गायींना गाभण करण्यासाठी एखादागोर्हा शेतकामासाठी वापरला न जाता, त्याला न ठेचता तसेच ठेवले जाते, त्यांला ‘सांड’ असे म्हणतात. त्यांच्यापासून शेतकर्यांच्या घरी गायींपासून नवीन वासरू व गोर्हे जन्माला येणारे असतात. ते ताकदीचे
यावेत म्हणून या साडांना चांगले गवत, खुराक देऊन त्यांची काळजी घेतली जाते. गावातील अनेक शेतकरी त्यांच्या माजावर आलेल्या गायींसाठी हे सांड घेऊन जातात. या बदल्यात नाही शेतकर्यांना त्याचा मोबदलाही मिळत असतो. हे सांड खाऊन-पिऊन चांगले तयार झालेले असतात. त्यांच्यात बैलांपेक्षा ताकदही जास्त असते. त्यामुळे अनेकदा ते माजतात. माणसांवर धावून जातात. गाभण गायींशी सलगी करून त्यांना निकामी करतात. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. त्यांची उपयुक्तता बघून शेतकरी एका मर्यादेपर्यंत ते सर्व सहन करतो. गावकरीही सहन करतात, पण त्यांच्यापासून होणार्या त्रासाचे प्रमाण वाढल्यावर मात्र त्यांना ठेचून शेतकामाला लावतात.
‘सांड’ या कथेमध्ये इसीनाथ (विश्वनाथ पाटील) नावाचा एक मोठा शेतकरी आहे. त्याच्याकडे बजरंग्या नावाचा एक सांड आहे. त्या संपूर्ण गावात तो एकच सोडण्यासारखा सांड असल्याने गावाच्या सरपंचासह अनेकांची त्याला विकत घेणयची इच्छा होती. हा सांड अतिशय उंच, जाडजूड, मजबूत व रुबाबदार होता. पाटलाच्या मते, याच्या जोडीला अजून असाच एक बैल किंवा सांड मिळाला तर त्यांची जोडी गावात एक नंबर राहिली असती. त्यामुळे ते त्याला विकत नव्हते. मात्र हा बजरंग्या खूप मारका होता. त्यामुळे त्याच्याजवळ जायची कुणाचीही हिंमत व्हायची नाही. शेवटी त्याला सांभाळण्यासाठी पाटील किसना पैलवानाला सालगडीम्हणूनठेवतो.
हा किसना पैलवानही बजरंग्या सांडासारखाच ताकदीचा होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. तो आखाड्यात जाऊन व्यायाम करायचा. कुस्त्या खेळायचा. तलवार, काठी चालवायचा. तीन माणसांना पुरून उरेल, एवढी ताकत त्याच्यामध्ये होती. आखाड्यात त्याचा दबदबा होता व गावातील सर्वजण त्याला घाबरून असायचे. या किसना पैलवानासमोर बजरंग्या सांड नरमून शांतपणे उभा राहतो. म्हणून त्याची जबाबदारी पाटील किसनावर सोपवतो.
पुढे बजरंग्या सांड खाऊन-पिऊन अधिक ताकदीचा बनतो. किसना पैलवानाला सुद्धा काम कमी व त्या बदल्यात चांगला मोबदला मिळू लागल्याने त्याचीही गावात प्रतिष्ठा वाढते. पाटलाकडे कामाला असल्यामुळे त्याला आधीपासून घाबरणारे लोकं आता जास्तच घाबरू लागतात. याचा फायदा किसना पैलवान नंतर घ्यायला सुरुवात करतो. गावातील काही अविवाहित मुली त्याच्यासारख्या खमक्या व ताकदीचा व्यक्ती नवरा म्हणून मिळवण्याचं स्वप्न पाहायची. त्यापैकी पार्वती एक होती. तसेच देवकीसारख्या गावात काही विवाहित परंतु आपल्या नवर्यापासून आर्थिक व शारीरिक बाबतीत असंतुष्ट राहणार्या बायका होत्या. तसेच यशोदा ही विधवा स्त्री व सुगंधी ही नुकतीच वयात आलेली मुलगी होती. या व इतर बायकांबद्दल किसनच्या मनात वासना असते.
तो आधी देवकीशी संबंध प्रस्थापित करतो. तो तिला भाजीपाला व थोडे पैसे देऊ लागतो. आधी तो दररोज रात्री किंवा दिवसा तिच्या घरी जाऊ लागतो. नंतर तिच्या नवर्याने तक्रार केल्यावर ती स्वतः पाटलाच्या विहिरीवर धुणं धुण्याच्या निमित्ताने जा किसनाशी संबंध ठेवू लागते. किसना नंतर तिच्या माध्यमातून पारबती ह्या अविवाहित मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो व तो तिच्याशीही शारीरिक संबंध ठेवू लागतो. तिला लग्नाचे आमिष दाखवतो. त्याच्यापासून ती पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर तो देवकीसह तिला शहरात नेऊन कुणालाही न कळू देता तिचा गर्भपात करून घेतो.
पारबतीला असे वाटायचे की, किसनाचे आपल्यावर प्रेम असून तो आपल्याशी लग्न करेल. पण किसना तिला लग्नाच्या बाबतीत टाळू लागतो. मधल्या काळात यशोदा या विधवा स्त्रीशी शेतात गोड बोलून तो तिचा हात पकडतो. पण यशोदा इतर मुली व स्त्रियांप्रमाणे त्याच्या जाळ्यात अडकणारी स्त्री नसते. तिला एक मुलगा असतो. ती त्याच्यावर स्वतःचे चारित्र्य सांभाळून जीवन व्यतीत करीत असते. ती किसनाच्या या कृत्याचा गावभर बोभाटा करते. त्यामुळे त्याची गावभर बदनामी होते. विश्वनाथ पाटील त्याला कामावरून काढून टाकतो. एवढे होऊनही किसना त्याच्या गुर्मीत, घमेंडीतच गावात फिरत राहतो. त्याच्या मते, त्याचे कुणीही काहीही वाकडे करू शकणारे नसते.
यानंतर पारबती ही त्याच्यापासून दुसर्यांदा गर्भवती राहते. किसनाची गावात बदनामी झालेली असूनही, तो चांगल्या चारित्र्याचा नाहीहे माहीत असूनही ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार असते. ती त्याला पतीसारखे मानत असते. परंतु किसना तिच्या पोटातील बाळ “थे माह्यच होये का आखीन कोणाचं त मी काय समजू?” असे उत्तर देतो. त्याच्या या उत्तराने तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचा विश्वासघात होतो. किसनाने आपल्याला वापरुन घेतलेले असते. त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला असतो. त्यामुळेतिच्या जगण्याची उमेद संपते व ती फाशी घेऊन आत्महत्या करते. आत्महत्येनंतर तालुक्याच्या दवाखान्यातून गावकर्यांना बातमी कळते की, ती दीड महिन्याची गर्भवती होती. एवढी चांगली मुलगी कुणापासून गर्भवती राहिली असेल, असा विचार सारा गाव करत राहतं. तेव्हा त्यांचा किसनावर संशय येतो. इकडे पारबतीचा बाप आपल्या मुलीने आपले तोंड काळे केले म्हणून गावातून कुठेतरी निघून जातो. या घटनांमुळे संपूर्ण गावाला खूप दुःख होते. त्यांना किसनाचा खूप संताप येतो.
इकडे बजरंग्याला सांभाळायला किसना नसल्यामुळे तो इतर कुणालाही जुमानत नाही.गावातील काही वासर्या, गाभण
गायी, म्हशी यांच्याशी बळजबरी करून त्यांना कामातून काढून टाकतो. त्यामुळे विश्वनाथ पाटील वैतागतो. शेवटी विश्वनाथ पाटील व त्याचा नोकर शिरपत हे बजरंग्याला ठेचण्याचा व त्याला बैल बनवण्याचा निर्णय घेतात. त्याला पकडून ठेवणे खूप कठीण असल्याने ते आखाड्यातील किसनासारख्याच ताकदीचा शामराव व त्याच्या सहकार्यांची मदत घेतात. ते त्याला एके दिवशी बजरंगाला गळ्यात व पायामध्ये दोर टाकून पकडतात. त्याला ठेचतात. त्यानंतर दुसर्या आठवड्यात बजरंग्याला शेतीकामाला लावले जाते.
इकडे बजरंग्यासारखा त्रास किसनापासून गावातील मुली व बायकांना होऊ लागला होता. त्याच्यामुळे पारबती आत्महत्या करते. देवकीचे त्याच्याशी संबंध असूनही तिला त्याची चीड येऊ लागते. तिच्यामुळे यशोदा या चांगल्या चरित्राच्या विधवा महिलेची बदनामी होते. तरीही त्याला कुठलाही पश्चाताप होत नाही. त्याची गुर्मी, घमेंड, अहंकार व उपद्रवीपणा कमी होत नाही. तेव्हा काही गावकरी बजरंग्या सांडासारखा त्यालाही कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतात.
त्या गावात नागपंचमीच्या दिवशी गारोड्याचा खेळ, काठी, तलवार चालविणे इत्यादी खेळ व्हायचे. या नागपंचमीच्या दिवशी शामराव व किसना यांच्यात लाठीकाठी व तलवारीचा सामना होणार असतो. सामन्याच्या वेळेस काहीजण नायलॉनची दोरी आणतात. सामना रात्रीचा असतो. सामना सुरू झाल्यावर थोड्यावेळाने काहीजण सर्व लाईट बंद करतात. बजरंग्या सांडासारखं किसनालाही अनेकजण पकडतात. काही जण मध्ये मध्ये बॅटरी किंवा आगकाडी पेटवून थोडा वेळ उजेड करतात. गावकर्यांमध्ये हलकल्लोळ माजून ते जिकडे तिकडेपळतात. शामराव व त्याचे सहकारी किसनाचा एक हात व एक पाय तलवारीने कापून टाकतात.
अशाप्रकारे या कथेमध्ये बजरंग्या व किसना पैलवान यांची समांतर व काहीशी सारखी कथा आलेली आहे. त्यांच्या ताकदीचा गैरवापर ते करतात, त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होऊ लागतो. तेव्हा गावकरी एकत्र येऊन त्या दोघांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करतात.
भाषाशैली –
ही संपूर्ण कथा निवेदन व संवादाच्या भाषेसह नागपूर परिसरातील ग्रामीण बोलीतून लिहिलेली आहे. व्यक्तींची नावे इसिनाथ (विश्वनाथ), शिरपत (श्रीपत), किसना (क्रिष्णा-कृष्णा), शाम्राव (शामराव), इष्नू (विष्णू), पारबती (पार्वती) अशी आलेली आहेत. ग्रामीण भागात मूळ नावाचा असाच उच्चार केला जातो. ग्रामीण बोलीतील ठसकेबाजपणा, सौंदर्य, गोडवा या कथेतील प्रत्येक वाक्यातून व संवादातून जाणवतो. जरी ही ग्रामीण बोली असली तरी वाचल्यावर समजण्यासारखी आहे.
वातावरणनिर्मिती –
या कथेत ग्रामीण भागातील शेती, गावगाडा, विहीर, मळा, इत्यादी गोष्टी पार्श्वभागी आलेल्या आहेत. ग्रामीण भागात गावगाडा, निसर्ग, शेती, गुरं-ढोरं, प्राणी या सर्वांची मिळून एक जीवनपद्धती तयार झालेली असते. याचे चित्रण आपल्याला या कथेत बघायला मिळते. किसना हा देवकी किंवा पारबतीला विहिरीवर मळ्यात भेटतो. गुरांचा गोठा, गावातील गल्ल्या, नागपंचमीचा सण, त्यानिमित्ताने गावातील गारुड्याचा, काठी व तलवारीचा खेळ इत्यादी सर्व मिळून या कथेतील वातावरणनिर्मिती लेखकाने केलेली आहे.
व्यक्तिरेखा –
किसना :
या कथेत किसना हे महत्त्वाचे पात्र आहे. तो पैलवान असून आखाड्यात व्यायाम करतो. अंगापिंडाने अगदी मजबूत आहे. गावातील सर्व लोक त्याला घाबरून असतात. तो खूप घमेंडी असा तरुण आहे. त्याचे लग्न बाकी आहे. तो विश्वनाथ पाटलाच्या शेतात बजरंगी सांड याला सांभाळण्याचे काम करतो. त्याच्या घरात फक्त त्याची आई आहे. त्यामुळे त्याच्यावर धाक ठेवायला दुसरं कुणीच नाही.
तो गावातील अविवाहित मुली, विधवा किंवा विवाहित स्त्रिया यांच्याशी गोड बोलून त्यांना नादी लावतो, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. दोन मुलींची आई असलेल्या देवकीशी त्याचे शारीरिक संबंध असतात. तिच्या माध्यमातून तो पारबती नावाच्या मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढतो. त्याच्या पासून ती दोन वेळेस गरोदर राहते. पहिल्यांदा तो शहरात नेऊन तिचा गर्भपात घडवून आणतो. दुसर्यांदा पुन्हा गरोदर राहिल्यावर “थेमाह्यचहोयेकाआखीनकोनाचंतमीकायसमजू?”,असे म्हणून उलट तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. त्याच्या अशा विश्वासघातकीपणामुळे पार्वती फाशी घेऊन आत्महत्या करते.
तो यशोदा या विधवा स्त्रीलासुद्धा असाच गोड बोलून नादी लावण्याचा प्रयत्न करतो. तिच्याकडून पान-सुपारी घेताना तिचा हात पकडतो, म्हणजे तिचा विनयभंग करतो. ती त्याला शिव्या देते, शेतातील लोकांना बोलावते, नंतर गावात जाऊन बोभाटा करते. त्यामुळे त्याचा मालक त्याला कामावरून काढून टाकतो. तरी त्याला काही फरक पडत नाही.
त्याचा हा वाढता उपद्रव बघून गावकरी त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतात. नागपंचमीच्या दिवशी त्यांच्यात व शामराव नावाच्या पैलवानामध्येकाठीवतलवारीचासामनाहोतो. त्यावेळी काही तरुण एकत्र येऊन त्याला दोराने पकडतात. लाईट बंद करून अंधार करतात व अंधारातच त्याचा एक हात व एक पाय तलवारीने कापून टाकून त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतात.
पारबती –
ही या कथेतील स्त्री व्यक्तिरेखा आहे. ती एक अविवाहित तरुणी असते. दोन मुलांची आई शोभेल अशी ती शरीरपिंडाने मोठी दिसते. दोन-तीन वर्षापासून तिच्या लग्नासाठी बघणे सुरू असते. पण योग जुळून येत नसल्याने तिचे लग्न राहिले होते. ती गरीब घराण्यातील एक साधी मुलगी असते. घरातील धुणं धुण्यासाठी ती देवकी नावाच्या एका विवाहित स्त्रीसोबत विश्वनाथ पाटलाच्या विहिरीवर जायची. तिथे तिची किसनासोबत भेट होते. किसना तिच्याशी गोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तो तिला लग्नाचे आश्वासन देतो. आपल्याला चांगला पैलवान गडी नवरा मिळेल म्हणून ती आनंदात असते. किसनाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्याच्याशी शारीरिक संबंधही ठेवते. यातून ती दोनदा गरोदर राहते. पहिल्यांदा देवकी व किसनासोबत जाऊन गर्भपात करून आणते. दुसर्यांदा गरोदर राहते, तेव्हा ती किसनाला लग्नासाठी आग्रह धरते.
वास्तविक किसनाने यशोदी या विधवा स्त्रीचा हात धरल्याने त्याची संपूर्ण गावात बदनामी झालेली असते. असे असले तरी ती त्याच्याशी लग्नासाठी तयार असते. कारण ती त्याच्यावर प्रेम करत असते व दुसरे कारण म्हणजे त्याच्यापासून दुसर्यांचा गरोदर राहील्याने तिला त्याच्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. परंतु किसना तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. त्याने केलेला विश्वासघात पार्वती पचवू शकत नाही. ती फाशी घेऊन आत्महत्या करते. तिच्या मृत्यूनंतर दवाखान्यातून ती दीड महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी गावभर पसरल्याने तिची मृत्यूपश्चात बदनामी व्हायची ती होतेच.
अशा पद्धतीने एक साधी, सुखी अशा वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहणारी, किसनावर मनापासून प्रेम करणारी, त्याने दिलेला धोका सहन झाल्याने आत्महत्या करणारी पारबती ही व्यक्तिरेखा लेखकाने अतिशय जिवंतपणे उभी केलेली आहे.
देवकी –
देवकी ही विवाहित स्त्री आहे. तिच्या नवर्याचे नाव इष्णू आहे. तिला दोन मुलं आहेत. असे असूनही ती किसना या अविवाहित तरुणाशी शारीरिक संबंध ठेवते. रात्रीला त्याला जेवायला, झोपायला बोलवते. नवर्याला संशय आल्यावर तो किसना व देवकी दोघांना याबद्दल बोलतो. तेव्हा ती किसनाला “तुम्ही कायले येता घरी. माह्या घरवाला धड हाये का? मीच तं धुनं धुवाले येते विहिरीवर” असे म्हणून, विश्वनाथ पाटलाच्या शेतातील विहिरीवर धुणं धुवायचे निमित्त काढून दररोज किसनाला भेटायला जाऊ लागते.
ती नवरा घरात आल्यावर शांत राहते. पण एकदा का नवरा शेतात किंवा काही कामानिमित्त बाहेर गेला की, मोकाट सुटलेल्या गायीसारखी शेजार्यापाजार्यांकडे बसायला, पान खायला जाते. कधी पैसे असतील तर ती हॉटेलातून चिवडा व भजी आणून खाते. पान-सुपारी किंवा इतर गोष्टींसाठी ती किसनाकडून ही पैसे घेते. देवकी ही पार्वतीच्या नकळत किसनाला मदत करून पार्वतीला किसनाच्या प्रेमात अडकवते. तिच्या मदतीमुळेच पार्वती व किसनाचे प्रेमसंबंध सुरू होतात. मात्र असे असले तरी किसनाने यशोदेचा हात पकडणे तसेच पार्वतीला धोका देणे तिला आवडत नाही. तिची शारीरिक गरज म्हणून किसनाने तिला नादाला लावले म्हणून ती त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवते.
वरील प्रकरणानंतर मात्र ती त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकते व यानंतर माझ्या घरी येऊ नका, असे बजावते.