दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप
दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेतील सहभाग व राखीव जागांची तरतूद यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. ते आपल्या
हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यात आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना, इ. गोष्टी दिसून येतात. दुसर्या कोणत्याही साहित्यप्रवाहात आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत.
Read More