१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारवर्गाची आर्थिक परिस्थिती

प्रस्तावना :

स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीनदार हा अतिशय सधन असा वर्ग होता. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या मानाने या जमीनदारांची लोकसंख्या अतिशय कमी होती. म्हणजे एका गावात एक किंवा दोन घरे असायची. या वर्गाकडे मुबलक प्रमाणात शेती होती. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. याव्यतिरिक्त काही जमीनदारांकडे शेतसारा वसुलीचे अधिकार होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाव, गावातील लोकं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अवलंबून असायचे. त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे असायचे. मोठमोठी घरे, वाडे, दागदागिने, महाग, किमती कपडे, दळणवळणासाठी घोडे, बैलांची सारवट गाडी यांचा वापर ते करत. जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणाच होता. कारण गावातील बहुतांश लोकं जमीनदारांच्या शेतावर राबून, प्रसंगी त्यांच्याचकडून कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह भागवित.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने जमीनदारी निर्मूलनाचा (कुळकायदा) केला. या कायद्याचा जमीनदारांच्या उत्पन्नाच्या साधनांवर, आर्थिक स्थितीवर, त्यांच्या राहणीमानावर खूप मोठा व दूरगामी परिणाम घडून आला. जमीनदारांची शेतजमीन जे शेतकरी, कुळं कसायचे, कुळकायद्याने ती शेती त्यांच्या मालकीची झाली. तसेच जमीनदारांकडची अतिरिक्त शेतजमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली. शेती हेच या जमीनदारांचे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे व प्रभावी साधन असल्याने नंतरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली. अनेक जमीनदारांकडे त्या-त्या भागातील शेतसारा वसुलीचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्याने त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे आणखी एक साधन कमी झाले. या अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदार कर्जबाजारी आणि आर्थिकदृष्ट्या बेजार झाले. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाचे, त्यांच्या आर्थिक स्थितीचे, राहणीमानाचे, पडझडीचे चित्रण पुढीलप्रमाणे आलेले आहे.

  • मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारांची आर्थिक परिस्थिती :

उद्धव शेळके यांच्या ‘धग’ (१९६०) कादंबरीमध्ये बाखड्या हा मोठा शेतकरी आहे. त्याच्याकडे किती जमीन आहे, याचा कुठेच उल्लेख आलेला नाही. परंतु शेती व इतर व्यवहारासाठी त्याने दिवाणाची नेमणूक केलेली आहे. त्याच्याकडे नेहमी शेतमजुरांचा राबता असतो. त्याचा मोठा वाडा आहे. तो गावातील लोकांना त्यांची शेती अथवा घर गहाण ठेवून त्यांची गरज भागविण्यासाठी व्याजाने पैसे देतो. लोकांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन गहाणखताचा मजकूर वाचून खरेदीखताच्या कागदपत्रांवर सही किवा अंगठा घेऊन त्यांची मालमत्ता हडप करतो. कौतिकच्या सासर्‍याचे (कौतिक- धगमधील महत्वाचे स्त्रीपात्र) घर त्याने गहाण ठेवलेले असते. त्याच्याबदल्यात तिच्या सासर्‍याला साडेतीनशे की चारशे रुपये दिलेले असतात. सुकदेवला साक्षीदार ठेवून त्याच्यासमोर गहाणखताचा मजकूर वाचून दाखविलेला असतो. मात्र कौतिकचा सासरा वारल्यावर त्याचे घर तो ‘विकत घेतले’, असे सांगून हडप करतो. त्याला माहीत असते की, सुकदेवसारखा सामान्य शेतकरी आपल्याविरुद्ध साक्ष द्यायला येणार नाही. कौतिक जेव्हा घराविषयी विचारायला जाते. तेव्हा “तुह्या तीनचारशे रुपल्ड्यासाठी मी इतली बेइमानी करू कायओ ! यापरस चौपटीचं पीक तं सालुनी चोट्टेपोट्टे खात असते माह्यावालं”१, असे उत्तर तो देतो. मात्र कौतिकच्या मुलाला नामाला वाचता येत असूनही तो कागदपत्र दाखवत नाही. त्याच्या वरील बोलण्यावरून त्याच्याकडे भरपूर शेती असावी, असे दिसून येते. त्याने आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी दिवाणजी ठेवलेला आहे. यावरून त्याचे आर्थिक व्यवहारही जास्त असावेत व शेतीतून येणारे उत्पन्नही जास्त असावे, तसेच त्याचा सावकारीचा व्यवहार असल्याचेही दिसून येते.

व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘वावटळ’ (१९६४) कादंबरीतील धोंडोपंत कुलकर्णी हे पेशाने वकील आहेत. मात्र त्यांच्याकडे भरपूर बागायती शेती आहे. कामाला अनेक गडीमाणसे आहेत. मळ्यामध्ये गोठा आहे. गुरेढोरे आहेत. गावात एक मोठे घर व आणखी काही घरे आहेत. तात्यासाहेब दप्तरदार हे आणखी एक श्रीमंत व्यक्ती या गावात आहेत. यांच्या वाडवडिलांनी बांधलेला पाऊणशे खण वाडा आहे. १९४८ साली एक लाख रुपये खर्चून बांधला जाणार नाही, एवढा तो मोठा वाडा होता, असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. ते स्वत: पुढारी आहेत. त्यांच्या व्यवसायाचा स्पष्ट उल्लेख कुठे आलेला नसला तरी त्यांच्याकडे भरपूर शेती होती, हे निश्चित. कारण त्याचा वाडा जेव्हा जाळला गेला तेव्हा वाड्यात एक हजार गुळाचा रवा, पस्तीस पोते गहू, चाळीस पोते ज्वारी, करडी, शेंगा इ. शेतीमाल होता. एखाद्या जमीनदाराच्या घरातच एवढे धान्य व तत्सम वस्तू असू शकतात. नायकाच्या गावातील तसेच आजूबाजूच्या नांदवडी, सोमेवाडी या गावातील अनेक कुलकर्णी-इनामदार ब्राह्मण हे आधीपासूनचे वतनदार होते. म्हणून त्यांच्याकडे भरपूर जमिनी होत्या. या शेतांमधून भरपूर उत्पन्न येत असल्याने त्यांचे मोठमोठे अवाढव्य वाडे त्यांनी, तर काही त्यांच्या वाडवडिलांनी बांधलेले होते. अनेकांनी त्यांच्या जमिनी त्यांना स्वत: कसणे शक्य नसल्याने कुळांना किंवा खंडकर्‍यांना कसायला दिलेल्या होत्या.

ब्राह्मणांव्यतिरिक्त गावात काही पाटील लोकंही मोठे शेतकरी होते. नायकाच्या गावातील तुकदेव पाटील यांचा दगडी बांधकाम असलेला मोठा वाडा आहे. भरपूर शेती आहे. गुरेढोरे, बौलगाड्या आहेत. वाड्यातील एका खोलीत धान्याच्या कणग्या, पोती आहेत. यावरून त्यांची श्रीमंती लक्षात येते आणि ही श्रीमंती भरपूर शेती असल्यामुळे आलेली आहे.

शंकर पाटील यांच्या ‘टारफुला’ या कादंबरीमध्ये गावपाटील सुभानराव पाटील, दाजिबा गायकवाड आणि केरूनाना पवार हे मोठे शेतकरी आहेत. “काळी करंद, मऊ लोण्यासारख्या मातीची दोन अडीचशे एकर जमीन होती. एकेक डाग हत्तीच्या पायासारखा होता ! सगळ्या विहिरी बांधीव दगडाच्या होत्या. आणि तळाला उभे झरे होते. पाण्याला कधी तोटा नव्हता. जमीन मुबलक होती. हो तर ऊस लावा, हो तर पानमळा करा. जे करावं ते साधत होतं आणि पेरावं ते उगवत होतं. दगड पेरला तरी उगवून आला असता अशी सुपीक जमीन होती. सगळ्या जमिनी पाटलांनी घरात ठेवल्या होत्या. राबणार्‍या गड्यांचा कधी तोटा पडला नव्हता. जनावरांवाचून औताचा कधी खोळांबा झाला नव्हता.”२ अशा प्रकारे पाटलांच्या शेतीचे वर्णन लेखकाने केलेले आहे. तसेच त्या कालखंडात पाटलांकडे गुरांना टाकायचा कडबा कापण्याचे यंत्रही होते. या यंत्रामुळे जलद व कमी मेहनतीत कडबा-चारा कापता यायचा. औत-बारदाण, गुरे-ढोरे स्वत:ची होती. बागायती शेती आणि राबणारे भरपूर मजूर, कुळं असल्याने पाटलांना या शेतीतून प्रचंड उत्पन्न येत असे. ऊस, पानमळा, कांदे अशी नगदी पिके पाटील या जमिनीतून घेत असल्याचे दिसून येते. थोडक्यात उत्पन्नाची चांगली साधने पाटलांकडे आहेत. त्यामुळे पाटील अतिशय श्रीमंत आहेत.

त्यांचा भला मोठा ‘शंभर आखणी चिरेबंद’ वाडा होता. बाहेर प्रवासाला, कोल्हापूरला जाण्या-येण्यासाठी चांगली सारवट अशी बैलगाडी होती. तिला छान अशा काचा बसवलेल्या होत्या. या गाडीला जुंपण्यासाठी म्हैसुरी खिल्लारी जोडी होती. चार ते पाच मिनिटाला ते एका मैलाचे अंतर तुडवू शकत होते. गावात रपेट मारायला, चावडीवर जायला घोडा होता. त्यांच्या लहान मुलाच्या हातात सोन्याचे कडे होते. या सर्व गोष्टींवरून पाटलांची आर्थिक स्थिती, त्यांचे राहणीमान अतिशय उत्तम असल्याचे दिसते.

केरूनाना पवार आणि दाजिबा गायकवाड हे देखील श्रीमंत गृहस्थ या गावात आहेत. त्यांच्याकडेही बर्‍यापैकी शेती आहे, विहिरी आहेत. म्हणजे त्यांचीही बागायती शेती आहे. मोठमोठाली घरे आहेत. आर्थिक स्थिती व राहणीमान चांगले असल्याने गावावर दबाव राखून आहेत. ते स्वत:, त्यांची मुले शेतात राबतात व उत्पन्न काढतात.

‘इंधन’ ही हमीद दलवाई यांची १९६८ सालची कोकणातील चिपळूणजवळील एका गावातील खोत, कुणबी व नवबौद्ध यांच्या परस्पर संबंधांवर व संघर्षावर आधारलेली एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीतील मुस्लीम हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जमीनदार होते. गावातील बहुतांश जमिनीची मालकी त्यांच्याकडे होती. गावातील कुळवाडी (कुणबी) त्यांच्या जमिनीवर कुळवाडी, कुळं म्हणून काम करायचे. या जमीनदारांची आर्थिक स्थिती त्या काळात उत्तम होती. गावात त्यांची चुन्याची, जांभ्या दगडाची अवाढव्य घरे होती. शेतीतून येणारे उत्पन्न हे त्यांच्या उत्पादनाचे मुख्य साधन होते. त्यामुळे ते समृद्ध आणि संपन्न जीवन जगत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सरकारने कुळकायदा केल्याने जमीनदारांच्या जमिनी जे कुळं कसत होते, त्यांच्या मालकीच्या होऊन गेल्या. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम जमीनदाराची बरीचशी जमीन अचानक कमी झाली. त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेली शेती चालली गेली. त्यांची स्थावर मालमत्ता कमी झाली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदारांना दारिद्र्य आले. आधी गावातील कुळवाडी त्यांच्या शेतात राबायचे व जमीनदारांना आयते उत्पन्न मिळायचे. त्यामुळे त्यांना शेतात कामाची फारशी सवय नव्हती. आता त्यांच्या जमिनी कुळवाड्यांच्या मालकीच्या झाल्याने ते जमीनदारांच्या शेतात कामाला येईनासे झाले. त्यामुळे अननुभवी जमीनदारांचे उत्पन्न घटले. नायकाच्या कुटुंबालासुद्धा या बदललेल्या परिस्थितीचा फटका बसलेला दिसून येतो. कुळकायद्यानंतरच्या पंधरा वर्षात नायकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खचले. संकटांचे, कर्जांचे, मानहानीचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. यातून त्यांच्या कर्जबाजारीपणाचा उल्लेख येऊन जातो. याचा अर्थ असा की, पूर्वाश्रमीचे अनेक जमीनदार कुळकायद्यानंतर कर्जबाजारी, दरिद्री झाले. घटलेली शेती आणि घटलेले उत्पन्न हे त्यांच्या दारिद्रयाचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते.

असे असूनही काही जमीनदारांनी बदलेलेल्या परिस्थितीत स्वत:ला सावरलेले दिसते. गावातील काही जमीनदारांनी नवीन घरे बांधलेली आहेत. पूर्वीच्या चुन्याच्या, जांभ्या दगडाच्या घरांशेजारी त्यांची काँक्रीटच्या भिंतीची आणि मंगलोरी कौलांनी मढवलेली घरे उभी राहिली आहेत.

‘गांधारी’ ही कवी ना. धों. महानोर यांची कादंबरी. या कादंबरीत राघो पाटील, लालजी, जगदेव हे मोठे शेतकरी आहेत. यांच्याकडे भरपूर शेती आहे. राघो पाटलांची शेती त्यांचा मुलगा भागवत करतो. तो सुशिक्षित आहे. शेतीत तो आधुनिक तंत्र वापरतो. रात्रंदिवस कष्ट घेतो. म्हणून त्याला खूप उत्पन्न मिळत असल्याने त्याची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. तो गावातील कित्येक लोकांचे सोसायटीचे कर्ज एकटा फेडून टाकतो. त्याच्या शेतात तो केळी, मोसंबी इ. फळपिके तसेच गहू, हायब्रीड ज्वारी इ. पिके घेतो. त्याचा मित्र लालजी हाही श्रीमंत जमीनदार आहे. त्याचीही आर्थिक स्थिती अतिशय चांगली आहे.

  • हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदार/ मोठे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती :

रामदरश मिश्र यांच्या ‘पानी के प्राचीर’ या कादंबरीतील पांडेपुरवा या गावात घनश्याम तिवारी, वैकुंठ पांडे आणि मुखिया कुबेर पांडे हे अतिश्रीमंत आहेत. घनश्याम तिवारी हे या गावातील सुदामा पांडेचे व्याही आहेत. सुदामा पांडेंच्या मृत्यूनंतर त्यांची जायदाद त्यांच्या मुलीच्या, म्हणजे घनश्याम तिवारींच्या सुनेच्या नावावर झालेली आहे. घनश्याम तिवारी हे आधी स्टेशन मास्तर होते. तिथे त्यांनी खूप पैसा कमावलेला असतो. आता ते पांडेपुरवामध्ये राहतात. त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे. त्यांचा मोठा मुलगा ती सांभाळतो. त्यांचे शहरात गोरखपूरमध्येही मोठे व सुंदर घर आहे. त्यांचा दुसरा मुलगा एम. ए. व वकिलीचे शिक्षण घेत आहे. मुलगी संध्यासुद्धा शहरात उच्च शिक्षण घेत आहे. मुखिया कुबेर पांडे हे कलकत्त्यात काम करणार्‍या भावाच्या कमाईवर व गोरगरिबांच्या शोषणावर श्रीमंत झालेले आहेत. गावातील अनेक लोकांची शेती व घरे त्यांनी बळकावून घेतलेली आहेत. गजेंद्र सिंह हे या भागातील सर्वांत मोठे जमीनदार आहेत. या परिसरातील अनेक गावांचा शेतसारा वसूल करायचा अधिकार इंग्रज सरकारकडून त्यांना प्राप्त झालेला आहे. शेतसारा गोळा करण्यासाठी त्यांनी अनेक तहसीलदार, अधिकारी, त्यांच्या मदतीला शिपाई व इतर माणसे ठेवलेली आहेत. त्यांची खूप मोठी हवेली आहे. कलमी आंब्यांचा बगीचा आहे. या परिसरातील ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

शिवप्रसाद सिंह यांच्या ‘अलग-अलग वौतरणी’ या कादंबरीतील जैपाल सिंह हे करैता या गावातील जमीनदार होते. स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी प्रथा नष्ट करण्यात आली. मात्र त्याच्या आधी व नंतरही त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होती. त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे होते. गावातील यात्रेत ते पाच मण लाडू वाटायचे. प्रत्येक व्यक्तीला दोन-दोन लाडू द्यायचे. दसर्‍याचा व होळीचा सण त्यांच्या घरी खूप उत्साहाने साजरा केला जायचा. संपूर्ण गाव या सणांमध्ये सहभागी व्हायचे. गवळींकडून दही-दूध, माळींकडून भाजीपाला, कोळींकडून मासे, विणकर व धनगरांकडून इतर वस्तू त्यांना मिळायच्या. गावातील बहुतांश जमीन त्यांच्या मालकीची होती. म्हणून घरात, शेतात अनेक मजूर नेहमी कामाला असायचे. धान्याच्या कोठ्यातून धान्य काढून अंगणात, ओट्यावर, गच्चीवर पसरवले जायचे. थंडीच्या दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धान्य कुटण्याची तीन यंत्रे चालू राहायची. त्यांच्याकडे एक घोडी होती, घोडे होते. पगडी अंगरखा, मलमलचा सदरा, धोतर असा त्यांचा पोषाख असायचा. जमीनदारीमुळे संपूर्ण गाव व परिसरावर त्यांचा धाक होता.

स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी नष्ट झाल्यामुळे त्यांची बरीचशी जमीन भूमिहीनांमध्ये वाटली जाते. त्यांचा गावावरचा धाक कमी होतो. मात्र तरीदेखील त्यांच्याकडे बरीच संपत्ती, शेती शिल्लक राहते. पुरेशी मते मिळू शकत नसल्याने लोकशाही मार्गाने ते निवडून येऊ शकत नसतात. तेव्हा ते राजकारण, डावपेच आखून गावातील सुरजू सिंह नावाच्या दुसर्‍या प्रभावशाली व्यक्तीचा पराभव करतात व सुखदेवरामला निवडून आणतात. त्याला हाताशी धरून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपले आर्थिक हित साधत राहतात. गावातील भानगडींमध्ये ती दाबण्यासाठी संबंधित लोकांकडून पैसे उकळतात. देवा नावाचा व्यक्ती फुला या महिलेचा खून करून तिचे दागिने हडप करून घेतो. हे प्रकरण दाबण्यासाठी ते त्याच्याकडून एक हजार रुपये घेतात. त्यांच्या मृत्यूनंतर श्राद्धाच्या वेळेस हजारो लोकांना आमंत्रण देऊन अन्नदान केले जाते. पाचशे ब्राह्मणांना जेवू घातले जाते आणि त्यांना प्रत्येकाला मलमलचा पंचा व चार आणे दक्षिणा दिली जाते.

त्यांचा लहान मुलगा विपिन इतिहास या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतो आणि नोकरीचा शोध न घेता पुढे काय करायचे, या विचारात एक वर्ष घालवतो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तो एवढे शिक्षण घेऊन परत निवांत राहू शकतो. त्या काळात सामान्यांना साधे शिक्षण घेणेही दुरापास्त असल्याचे दिसून येते. धरमू सिंहाच्या घरच्या लिलावाच्या वेळेस विपिन सहज चारशे रुपयांची मदत करतो.

पुढे मात्र या जमीनदारांच्या घराण्याची आर्थिक स्थिती ढासळलेली दिसून येते. कारण यांना स्वत:च्या शेतात कष्ट करण्याची सवय नव्हती. ते पूर्णत: सालगड्यांवर, शेतमजुरांवर अवलंबून होते. जमीनदारी निर्मूलनानंतर बर्‍याचशा सालगड्यांना, कुळांना जमीनदांराची शेती मिळाली. ते शेतकरी झाले व स्वत:ची शेती कसू लागले. दुसरे असे की, या जमीनदारांना उच्च राहणीमान, खोटी प्रतिष्ठा, ऐषोआरामाची सवय होती. जमीनदारीच्या काळात ते सर्व खपून गेले. आता मात्र ते राहणीमान कायम ठेवणे कठीण जाऊ लागले. जैपाल सिंहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची अशीच अवस्था होते. स्वत:चा वारेमाप खर्च भागविण्यासाठी त्यांचा मोठा मुलगा बुझारथ दरोडे टाकू लागतो. घरखर्च भागविण्यासाठी त्याच्या पत्नीला दागिने व घरातील वस्तू विकाव्या लागतात. संकटात सापडलेल्या शशिकांत गुरुजींना मदत करण्यासाठी विपिनकडे दोनशे दहा रुपयेही नसतात.

या गावात खलील मियाँ हे दुसरे जमीनदार (किंवा ज्यांना मोठे शेतकरी म्हणता येईल) आहेत. त्यांच्याकडे पन्नास बिघे शेती असते. तीसुद्धा खूप सुपीक. त्या काळात त्यांचे राहणीमान खूप उच्च असते. जमीनदारी निर्मूलनानंतर त्यांचीही थोडी शेती त्यांच्या कुळांमध्ये वाटली जाते. तसेच त्यांना सालगडी व शेतमजूर मिळणे कठीण होऊन बसते. मग ते स्वत: शेतात राबायला लागतात. परंतु एवढी जमीन कसणे त्यांना शक्य होत नाही. तरी स्वत: कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यापुरते उत्पन्न ते काढून घेतात. जमीनदार असल्यामुळे मुलीला चांगले स्थळ शोधतात. स्वत:कडे पैसे नसताना वीस बिघे शेती गहाण ठेवून दोन हजार रुपये कर्ज घेतात व मुलीचे लग्न लावून देतात. पुढे ती व्यक्ती ती शेतजमीन बळकावून घेते आणि पूर्वाश्रमीच्या जमीनदार असलेल्या खलील मियाँना वाईट दिवस येतात. त्यांची पत्नी बायकांचे ब्लाऊज, लहान मुलांचे कपडे व स्वेटर शिवून-विणून घरखर्च भागवू लागते. शेवटी खलील मियाँ पत्नीच्या आग्रहाखातर करैता हे गाव सोडून सासरी निघून जातात.

‘आधा गाँव’ ही राही मासूम रजा यांची मोठी कादंबरी. या कादंबरीतील गंगौली या गावात मुस्लीम जमीनदार आहेत. जमीनदारी निर्मुलनाच्या आधी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. गावात त्यांची मोठमोठी घरे होती व अजूनही आहेत. आंब्याच्या बागा व शेती होती. त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्यांच्या घरातील मुले चांगले शिक्षण घेऊन काही सरकारी नोकरीत आहेत. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते. त्यांच्या घरी नोकर चाकर होते. जमीनदारी निर्मूलनानंतर मात्र त्यांची स्थिती दयनीय झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्यांना जमीनदारी नष्ट होईल असे कधीच वाटले नव्हते. राही मासूम रजा लिहितात की, “जब तक मियाँ लोग सिर्फ यह सुनते रहे कि जमींदारीयाँ खत्म होनेवाली हैं उस वक्त तक हँसते रहे, इस किस्म की बातें करनेवाले का मजाक उड़ाते रहे कि जमींदारी कैसे खत्म हो सकती है। यह बात समझ में आनेवाली भी नहीं थी। गाँव के बूढ़े किसानों को भी यक़ीन नहीं था कि जमींदारी खत्म हो सकती है। परुसराम की बातें सुनकर वह खुश होते, पर उनके दिलों में बैठा हुआ सदियों का डर उन्हें टोक देता। जमींदारी मजहब की तरह मजबूत थी। शख्सियत उसके चुंगल में थी। उनका जी चाहता कि जमींदारी खत्म हो जाये कि वह अपनी जमीन के मालिक बन जायें, मगर उनमें यह आरजू करने का हौसला नहीं था, इसीलिए जब एक रात को बारह बजे डुग्गी बजी और ऐलान हो गया कि जमींदारियाँ खत्म हो गयीं तो इस बात को जमींदारों की तरह बूढ़े किसानों ने भी तस्लीम नहीं किया। जमींदारों ने चंदा जमा किया, उनके जलसे हुए। जलसों में रिजोलेशन पास हुए। … दूर-दूर तक फैले हुए बाग और खेत-इतनी बडी कायनात सिमटकर चंद कागजों में आ गयी। कागज फिर कागज होता है। उस पर किसी मुआशरे की बुनियादे नहीं कायम की जा सकतीं। बटाई पर दी हुई सीर की जमीनें निकल गयीं। हम्माद मियाँ के अलावा किसी जमींदार के पास एक धुर जमीन नहीं थी। ये तमाम लोग देखते-देखते पलभर में नूरुद्दीन शहीद के मकबरे की तरह गिर गये।”३

अशा प्रकारे त्यांची पिढ्यांपिढ्यांची शेती जमीनदारी निर्मूलनाच्या कायद्यामुळे सरकारने काढून घेतली. या बदल्यात त्यांना थोडाफार मोबदला मिळाला. मात्र शेतीतून कायमस्वरूपी उत्पन्न मिळत राहते. ते उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन असते. ती स्थावर मालमत्ता असते. तिच्यामुळे गावात एक प्रकारचा रूबाब, मानसन्मान असतो. जमीनदारांकडून तीच जमीन सरकारने काढून घेतल्याने त्यांच्या या सर्व गोष्टींवर परिणाम झालेला दिसून येतो.

हम्माद मियाँ हे हळूहळू श्रीमंत व जमीनदार बनलेले होते. स्वत:च्या दोन भावांची व गावातील इतर जणांची शेती त्यांनी सरकारी कर्मचारी, अधिकार्‍यांना लाच देऊन स्वत:च्या नावावर करून घेतलेली होती. एकूण पाच नांगर, बैलजोड्यांची शेती ते करायला लागले होते. हातात पैसे खेळू लागल्यानंतर ते गावात दोन मजली घर बांधतात. त्यांच्याकडे जमुनापारी जातीच्या दोन म्हशी असतात. गया अहीर हा सालगडी त्यांच्याकडे कामाला असतो. त्यांचे कपडे, राहणीमान अतिशय उच्च दजाचे असते. जमीनदारी निर्मूलनानंतरही ते टिकून राहते.

सलीमपूरचे अशरफुल्लाह खान हे देखील जमीनदार होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ते शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करायचे. त्यांना कर्ज द्यायचे. नंतर व्याजासह वसूल करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी निर्मूलनानंतर ते पाकिस्तानात निघून गेलेले आहेत. कदाचित त्यांचीही जमीन कुळांमध्ये, भूमिहीनांमध्ये वाटली गेली असावी.

या जमीनदारांना कष्टाची व कामांची सवय नव्हती. पूर्ण आयुष्य जमीनदारी थाटात गेलेले होते. त्यामुळे मिगदाद, हम्माद मियाँ सोडले तर गंगौलीतील पूर्वाश्रमीचे जवळपास प्रत्येक जमीनदार अन्नाला मोताद झालेले आहेत. याचा परिणाम धार्मिक कार्यांवरही होतो. ताजिया बंद होतो. मोहरममध्ये पूर्वीची रंगत राहत नाही. मजलिसेनंतर प्रसाद वाटणे बंद होऊन जाते. या जमीनदारांच्या दाराशी बैठका व्हायच्या. बैठकीत बसणार्‍यांना पान-तंबाखू मिळायची. पण नंतर हे सर्व बंद होऊन जाते.

‘जल टूटता हुआ’ या रामदरश मिश्र यांच्या कादंबरीत महीप सिंह हे खूप मोठे जमीनदार आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात या संपूर्ण परिसरातील शेतसारा वसुलीचा अधिकार त्यांच्याकडे होता. ते त्यांच्या उत्पन्नाचे खूप मोठे साधन होते. शेतसारा वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे तहसीलदार, अधिकारी, शिपाई अशी यंत्रणा होती. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मात्र जमीनदारी पद्धत कायद्याने बंद झाली. तसेच भारत सरकारने शेतसारा वसुलीसाठी सरकारी यंत्रणा सुरू केल्याने जमीनदारांकडून तो अधिकार काढून घेण्यात आला. याचा खूप मोठा आर्थिक परिणाम जमीनदारांवर झालेला दिसून येतो. त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन कमी झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळते. महीप सिंहाकडे अनेक माणसे कामाला आहेत. आधी त्यांना दर महिन्याला नियमितपणे वेतन मिळायचे. आता मात्र कित्येक महिने त्यांना ते मिळत नाही. सतीश म्हणतो की, “बेचारे सिपाहियों की तनखाह कब से पडी हुई है। … दो बार, चार बार ये सब अरज करते हैं, मेरा जी खाते हैं, किंतु मेरे पास अब रहा क्या ? तब जमींदारी थी, लगान के सारे पैसे मेरे पास आते थे, सारे सिपाहियों, कहारों, खवासों की तनखाह लगान के पैसों में से चुका दिया करता था। अब तो सब ठनठन गोपाल है।” ४ मजुरांना मजुरी द्यायला, पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे अनेक मजूर, शिपाई त्यांना सोडून गेलेले आहेत. नंतर सतीशसुद्धा त्यांना सोडून जातो. पुढे तर गोरखपूरच्या बनियाचे त्यांच्यावर एक लाख रुपये कर्ज होते. ते फेडण्यासासाठी त्यांची शेतजमीन लिलाव होणार असते. थोडक्यात, स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारांची आर्थिक स्थिती ढासळलेली दिसते. असे असले तरी आजसुद्धा त्यांच्याकडे स्वत:ची भरपूर शेती आहे. त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. त्यांनी ते टिकवून ठेवलेले आहे.

रामदरश मिश्र यांच्याच ‘सूखता हुआ तालाब’ या कादंबरीत शिवलाल व शामलाल हे मोठे शेतकरी आहेत. यांच्याकडे भरपूर शेती असल्याने या दोघांचे उत्पन्न, आर्थिक स्थिती भक्कम आहे. गावात कितीही दुष्काळ पडला तरी यांना त्याचा फार मोठा फटका बसत नाही. कारण एकतर त्यांची शेती बागायती आहे व पाणी उपसण्यासाठी शेतात ट्यूबवेल आहे. त्यामुळे त्यांना बारमाही उत्पन्न घेता येते. त्यांच्या उत्पन्नावर काहीच परिणाम होत नाही. गावातील लोकं दरवर्षी पावसाळ्यात त्यांच्याकडूनच धान्य व पैसे घेऊन जातात. गावातील लोकं आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून आहेत.

  • निष्कर्ष :

१) जमीनदार हा ग्रामीण भागातील अतिशय सधन असा वर्ग होता. ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाचे, त्यांच्या आर्थिक स्थितीचे, राहणीमानाचे, पडझडीचे चित्रण आलेले दिसून येते.

२) ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या मानाने जमीनदार हा वर्ग संख्येने अतिशय कमी असलेला दिसून येतो. म्हणजे ‘इंधन’, ‘आधा गाँव’ या कादंबर्‍यांमधील गावांचा अपवादवगळता प्रत्येक गावात जमीनदारांचे एखाद-दुसरे घर असल्याचे दिसते.

३) या वर्गाकडे मुबलक प्रमाणात शेती होती. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. याव्यतिरिक्त काही जमीनदारांकडे शेतसारा वसुलीचे अधिकार होते. तसेच गरीब लोकांना कर्ज देणे (सावकारी), कर्जाची रक्कम परतफेड न केल्यास त्यांच्या जमिनी, घरे जप्त करणे हीदेखील त्यांच्या उत्पन्नाची साधने होती. यातून ते अतिश्रीमंत झालेले होते.

४) त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे होते. मोठमोठी घरे, वाडे, दागदागिने, महाग, किमती कपडे, दळणवळणासाठी घोडे, बैलांची सारवट गाडी यांचा वापर ते करायचे.

५) त्यांच्याकडे भरपूर शेती असूनही ते स्वत:च्या शेतात राबत नसत, तर त्यासाठी शेतमजूर, सालगडी ठेवत. तसेच त्यांची बरीचशी शेती कसण्यासाठी कुळांना दिलेली होती, उत्पन्न मात्र त्यांनाच मिळायचे.

६) खेड्यातील बहुतांश जमिनीची मालकी तसेच शेतसारा वसुलीचे व इतर प्रशासकीय अधिकार जमीनदारांकडे असल्याने, जवळपास संपूर्ण गाव, गावातील लोकं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अवलंबून असलेले दिसून येतात.

७) जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणाच होता. कारण गावातील बहुतांश लोकं जमीनदारांच्या शेतावर राबून, प्रसंगी त्यांच्याचकडून कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह भागवित.

८) जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील गरजू व भूमिहीन लोकांच्या श्रमाचे शोषण करून, त्यांच्या अज्ञानाचा व गरिबीचा गौरफायदा घेऊन श्रीमंत झालेला होता.

९) स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने जमीनदारी निर्मूलनाचा कायदा (कुळकायदा) केला. या कायद्याचा जमीनदारांच्या उत्पन्नाच्या साधनांवर, आर्थिक स्थितीवर, त्यांच्या राहणीमानावर खूप मोठा व दूरगामी परिणाम झालेला आहे.

१०) जमीनदारांची शेतजमीन जे शेतकरी, कुळं कसायचे, कुळकायद्याने ती शेती त्यांच्या मालकीची झाली. तसेच जमीनदारांकडची अतिरिक्त शेतजमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली. शेती हेच या जमीनदारांचे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे व प्रभावी साधन असल्याने नंतरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळलेली दिसून येते.

११) अनेक जमीनदारांकडे त्या-त्या भागातील शेतसारा वसुलीचा अधिकार होता. हेदेखील या जमीनदांरांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्याने त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे आणखी एक साधन कमी झाले.

१२) पूर्वाश्रमीच्या जमीनदारांना शेतात काम करण्याची सवय नव्हती. या कामाचा व या संदर्भातील ज्ञानाचा त्यांच्याकडे अभाव होता, अनुभव नव्हता. तसेच या जमीनदारांची जमीन भूमिहीनांना मिळाल्याने ते आपल्याच शेतात कष्ट करू लागले. त्यांनी मजुरी वा सालगडी म्हणून काम करणे कमी केले, तर काहींनी बंदच केले. त्यामुळे जमीनदारांना नंतरच्या काळात शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळेनासे झाले.

१३) या जमीनदारांना जमीनदारीच्या काळात वारेमाप खर्च करण्याची, उच्च राहणीमानाची सवय होती. त्यामुळे ते नंतरच्या काळातही काही प्रमाणात तसेच राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र त्यांना ते शक्य होत नाही.

१४) या अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदार कर्जबाजारी आणि आर्थिकदृष्ट्या बेजार झालेले आहेत. घरखर्च चालविण्यासाठी त्यांना दागिने, भांडीकुंडी, जमिनी विकाव्या लागल्या आहेत.

१५) जमीनदारांच्या आर्थिक स्थितीचे, स्थित्यंतराचे, श्रीमंती व पडझडीचे चित्रण मराठीतील ग्रामीण कादंबर्‍यांपेक्षा हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये जास्त प्रमाणात व अधिक तीव्रतेने आलेले दिसून येते. मराठीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये फक्त ‘टारफुला’ या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व आणि ‘इंधन’ या कादंबरीत स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जमीनदारांच्या आर्थिक परिस्थितीचे सविस्तर चित्रण आलेले दिसते.

  • संदर्भ टीपा :

1) उद्धव शेळके, ‘धग’, पृ. २२६.

2) शंकर पाटील, ‘टारफुला’, पृ. १२, १३.

3) राही मासूम रजा, ‘आधा गाँव’, पृ, २९२, २९३.

4) रामदरश मिश्र, ‘जल टूटता हुआ’, पृ. १५.

  • संदर्भ ग्रंथ-

1) दलवाई, हमीद, ‘इंधन’, मौज प्रकाशन गृह, मुंबई, तिसरी आवृत्ती, १९९५.

2) पाटील, शंकर, ‘टारफुला’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पु. र्मु. डिसे. २००९.

3) महानोर, ना. धों., ‘गांधारी’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पु. र्मु. २००७.

4) माडगूळकर ,व्यंकटेश, ‘वावटळ’, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पु. र्मु., २००८.

5) मिश्र, रामदरश, ‘जल टूटता हुआ’, वाणी प्रकाशध्न, नवी दिल्ली, संस्करण २००४.

6) मिश्र, रामदरश, ‘पानी के प्राचीर’, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, तृतीय संस्करण २००८.

7) मिश्र, रामदरश, ‘सूखता हुआ तालाब’, वाणी प्रकाशध्न, नवी दिल्ली, प्रथम संस्करण २००५.

8) रजा, राही मासूम, ‘आधा गाँव’, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, सहावी आ. २००९.

9) शेळके, उद्धव ज., ‘धग’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, सातवे पु. र्मु. २०००.

10) सिंह, शिवप्रसाद, ‘अलग अलग वैतरणी’, लोकभारती प्रकाशन, इलाहाबाद, सातवे संस्करण २००८.

————————————–XXXOOOXXX——————————-

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

4 thoughts to “१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारवर्गाची आर्थिक परिस्थिती”

  1. जमीनदार वर्ग मराठी साहित्यात दुर्लक्षितच आपण या भागावर लेखात प्रकाश टाकलात.हिन्दी साहित्याशी सांगड घालत तुलनात्मक केलेले अध्ययन व सप्रमाण निष्कर्ष यामुळे सदर लेख वाचनीय व ज्ञानवृद्धी करणारा आहे…..अभिनंदन राहूल सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *