‘वाफ’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)

          ग्रामीण भागात बर्‍याचदा माणसांतील नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असते. यातून मग संघर्ष निर्माण होतो. ‘वाफ’ ही कथा गावातील संघर्ष, मारामारी, खून यावर आधारलेली आहे.

          ‘वाफ’ कथेची सुरुवात वामन पैलवानाचा मृत्यू व त्याची बातमी गावभर पसरल्यानंतर गावात जी खळबळ माजते, त्यापासून होते. वामन पैलवान हा एकाच वेळी दहा माणसांना पुरून उरला असता, अशा ताकदीचा गडी होता. तो अविवाहित होता. त्याची भाऊरावशी मैत्री होती. तो अनेकदा दिवसा व रात्रीसुद्धा भाऊरावकडेच राहायचा. त्यांचे जेवणही बऱ्याचदा त्याच्याकडेच असायचे. भाऊरावच्या बायकोने त्याला धर्माचा भाऊ मानलेले होते. भाऊरावचा देखील त्याच्यावर खूप विश्वास होता. म्हणून भाऊराव घरी

असला-नसला तरी वामन हक्काने त्याच्या घरी राहायचा. गावात मात्र वामन व भाऊरावच्या बायकोच्या संबंधांची चर्चा होत राहायची.

          भाऊरावच्या पाठीशी वामन पैलवानाची भक्कम साथ असल्यामुळे भाऊरावचे गावावर वर्चस्व होते. त्याच्या वाट्याला कुणीही जायचे नाही. यामुळेच कदाचित गावातील बाबुराव कसार व त्याच्या मित्रांनी वामनाचा खून केलेला होता. वामनाचा पोटात गुप्ती घालून व दगडाने त्याचे तोंड ठेचून रात्रीच्या वेळेस त्याचा खून झालेला होता. सकाळी ही बातमी गावभर पसरते. त्याबरोबर संपूर्ण गाव त्याचा मृतदेह पाहण्यासाठी गावातल्या चौकात जमते. अख्या पंचक्रोशीला ही सुन्न करणारी घटना असते.

          भाऊरावला जेव्हा ही बातमी कळते, तेव्हा तो झोपेतून खडबडून उठतो. त्याचा या बातमीवर विश्वासच बसत नाही. कारण खूनाच्या काही तास अगोदर संध्याकाळी तो भाऊरावला भेटून गेलेला होता. या बातमीने भाऊराव खूप खचतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्याला वामनाचा खूप मोठा आधार होता व तो त्याचा अगदी जवळचा मित्र होता. त्याचा जणू उजवा हातच होता. अतिशय केविलवाण्या अवस्थेत इच्छा नसताना तो चौकाकडे जातो. तेथे गावातील गर्दीतील लोकांमध्ये वामनाविषयी कुजबूज व चर्चा सुरू असते. भाऊरावला बघून काही सहानुभूतीच्या सुरात बोलतात. तर काही जण“भाऊरावचा सगळा खर्च थोच भागोत व्हता”, असे म्हणून त्याची हसून थट्टाही करतात. पण त्या गर्दीकडे बघण्याची भाऊरावची हिम्मत होत नाही.

          दुपारनंतर गावात पोलीस येतात. वामनच्या प्रेताचा पंचनामा करतात. पाच-दहा माणसासोबत भाऊरावचीही जबानी घेतात. तेथून बाहेर पडताना गर्दीतून काही माणसे त्याची अशा गंभीर प्रसंगातही चेष्टा करतात. गर्दीतून बाबुराव कासार त्याला मुद्दामहून “काय भावराव, राच्च्या पायरी वामन झोपाला आला न्योहता वाट्टे” असा खोचक प्रश्न विचारतो. भाऊरावला त्याचा राग येतो. तो चिडून त्याला “तुह्या मायभैनीवर बसले गेला असनं थो भोसडीच्या….” असे उत्तर देतो. बाबुराव त्याला “ए मादरचोदा, मायभैन कोनाची काहाडत बे?” असे म्हणून त्याचा शर्ट पकडतो व “वामनच्या भरोस्यावर मस्ती करत व्हता. आता चांगला ठेचून काहाडीन भडवीच्या”, अशी धमकी त्याला देतो. या घटनेने भाऊरावच्या मनात निराधार झाल्यासारखी भावना निर्माण होते. त्याच्या पायातील बळ गळून पडते.

          तो घरी येतो. त्याला जेवण करायची इच्छाही होत नाही. त्याची बायको शकुन त्याला जेवणाविषयी विचारते. पण तो जेवत नाही. वर आढ्याकडे डोळे लावून एकटक बघत बसतो. वामनाच्या मृत्यूचा भाऊराव इतकाच शकुनलाही धक्का बसलेला असतो व तिची मुलंही त्याची आठवण काढत असतात. याविषयी ती भाऊरावला सांगते, तर गावातील लोकांच्या वामन व शकुनीच्या संबंधाबद्दलच्या चर्चेने व टोमण्यांनी बिथरलेला भाऊराव तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. बायकोवर कधीही हात न उगारणारा भाऊराव तिचे केस ओढून तिच्या पाठीत दोन-चार बुक्के घालतो. नंतर मात्र त्याचा त्यालाच पश्चाताप होत राहतो.

          दुपारनंतर चहा पिऊन तो शेताकडे जायला निघतो. गावात मारुतीच्या कट्ट्यावर बाबुराव कासार व रामा लोहार, विठोबा, हरबा हे त्याचे मित्र बसलेले असतात. ते त्याला बोलवतात. हा जातो. ते त्याच्याशी भांडण उकरून काढतात. त्याची गचांडी पकडून त्याला जमिनीवर पाडतात व “वामन जिता व्हता तवरी तुबी लय मुजोरी करत व्हता, न्हाई का? आता करनं मस्ती दाखवतो तुले?”,अशी धमकी त्याला देतात.

          लागोपाठच्या या घटनांनी भाऊराव घाबरून जातो. त्याच्या मनात भीती निर्माण होते. शेतात गेल्यावर बांधावरच्या खुणांचे दगड त्याच्या शेतात सरकवल्यासारखे त्याला वाटतात. मात्र ते मूळ जागेवर ठेवण्याची त्याची हिंमत होत नाही. अंधार पडायच्या आधी धापा टाकत तो घरी पोहचतो. अंधार पडल्यावरही त्याचा मोठा मुलगा जो दिवा लावायला देवळात गेलेला होता तो परत आलेला दिसत नाही. तेव्हा त्याच्या मनात पुन्हा भीती निर्माण होते. मुलगा परत आल्यावर तो बायको व मुलगा या दोघांवर त्यांच्यावर चिडतो. त्याच्या या भीतीग्रस्त मानसिकतेचे लेखकाने अतिशय समर्थपणे चित्रण केलेले आहे.

          रात्री झोपायच्या वेळेस शकुन त्याला सांगते की, बाबुराव कासार व रामा लोहार तो शेतात गेलेला असताना तीनदा त्याच्या घरासमोरून शिट्ट्या वाजवत गेले व जाताना घाण-घाण बोलले. दुपारचे व आताचे त्यांचे हे वागणे पाहून भाऊरावाचीही खात्री पटते की, वामनचा खून यांनीच केलेला असावा व आपला साधेपणा, आपली दुर्बलता यामुळे ते एवढे धाडस करू शकत आहेत. मग रात्रभर तो विचार करत राहतो. त्याला झोप लागत नाही. सकाळी सुर्योदय झाल्यावर मनाशी काहीतरी निर्धार करून तो कुर्‍हाड काढतो. तिला धार लावतो व सरपण घेण्यासाठी शेतात जात आहे, असे सांगून सरळ बाबुराव कासाराच्या घरी जातो. त्याचे दार वाजवतो व बाबुराव कासाराने दार उघडल्याबरोबर मागचा-पुढचा कसलाही विचार न करता भाऊराव त्याच्या डोक्यात कुर्‍हाडघालतो. बाबुराव खाली पडल्यावरही सर्व शक्ती एकवटून त्याच्या डोक्यात तीन-चार घाव घालतो व तो मेला याची खात्री करूनच घरी परततो. त्याच्या हातातील रक्ताने माखलेली कुर्‍हाड बघून त्याची बायको त्याला कोणाला मारलं म्हणून विचारते. तेव्हा तो बाबुराव कासाराचे नाव सांगतो. ती रडू लागते. तेव्हा तो तिला “अवं तं तू कायले रडतं. जाईन फासावर मी. लेकराईले सांभाळजो”,असे म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो. त्यानंतर दोन दिवसातच दोन खून पडल्याने गावात हल्लाकोळ माजतो.

          अशाप्रकारे गावात टोकाला पोहोचलेला संघर्ष, त्यातून पडलेले खून यांचे चित्रण या कथेत लेखकाने केलेले आहे. बाबुरावला मारून भाऊराव एकाच वेळेस मित्राच्या खुनाचा बदलाही घेतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या मनातील भीतीचाही कायमस्वरूपी खात्मा करतो. त्याच्या बायकोची बाबूराव व इतर लोकांकडून होणारी बदनामी व त्याच्याकडून तिला होणारा व भविष्यात होऊ शकणारा त्रास, मित्राची हत्या, त्याचे स्वतःचे दुबळेपण या सर्वातून त्याची बाबूरावची हत्या करण्याचा निर्णय घेण्याची मानसिकता तयार होते व ते कृत्य करतो आणि स्वतः शिक्षेसाठी सिद्ध होऊन पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो. गावातील व्यक्ती-व्यक्तींमधल्या अंतर्गत संघर्षाचा परिणाम कसा खुनामध्ये होतो, हे या कथेमधून लेखकाने अतिशय समर्थपणे चित्रित केलेले आहे.

          इतर कथांप्रमाणेच या कथेतील संवाद हे वैदर्भी बोलीतून असून निवेदनासाठी प्रमाण मराठीचा वापर केलेला आहे. तसेच ही कथा तृतीयपुरुषी निवेदन तंत्रातून लिहिली आहे.

          भाऊराव, बाबुराव कासार, शकुन, वामन पैलवान, रामा लोहार, साहेबराव हे या कथेतील पात्रे आहेत. वामन पैलवानाचा खून, भाऊराव व बाबुराव, रामा यांच्यातील बाचाबाची, भाऊरावचे बायकोला मारणे व शेवटी भाऊरावकडून बाबुरावचा खून ह्या या कथेतील महत्त्वाच्या घटना आहेत. ग्रामीण वातावरणात ही कथा साकार झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *