मला बुद्ध का आवडतात?
गौतम बुद्ध हे नाव मी पहिल्यांदा केव्हा ऐकले किंवा वाचले, हे मला आता आठवत नाही. त्यांच्याविषयी मला माहिती केव्हा मिळायला सुरुवात झाली, तो आरंभबिंदू, माझे तेव्हाचे वय हेही मी आज सांगू शकत नाही. पण साधारणत: गेल्या १४-१५ वर्षांपासून मी बुद्धांच्या विचारांच्या संपर्कात असेल. बुद्ध मला का आवडतात, किंबहुना सर्वात जास्त का आवडतात, हा प्रश्न आज मला स्वतःलाच पडला. मला आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सहज विचारले आहे की, तुमचे सर्वात आवडते महापुरुष कोणते? माझ्याकडून नकळत गौतम बुद्ध असे उत्तर दिले गेलेले आहे किंवा मनात तरी गौतम बुद्धांचेच नाव आलेले आहे. तर का आवडतात मला बुद्ध?
बुद्धांनी मानवाच्या दुःखाचे कारण शोधले. एवढेच नाही तर त्या दुःखावर उपायही सांगितले. बुद्धांनी देव ही संकल्पना नाकारली. वेदप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, पशुबळी इत्यादी गोष्टी नाकारल्या. त्यांच्या चिंतनातून जगाला एक नवी दिशा मिळाली. जगातील सर्व बुद्धिमान व संवेदनशील माणसांवर-ज्यांना कुणाला बुद्ध माहित आहे- त्यांच्यावर बुद्धांचा कमी जास्त प्रभाव आहे. गौतम बुद्ध यांना सर्व जातीपातीची, धर्म, लिंग, वंशाची विचारी माणसे आपलं मानतात. बुद्धासारखे होण्याचा ध्यास धरतात. त्यांच्याविषयी भरभरून बोलतात. भारतीय तत्वज्ञान, विचारधारा, जीवनविषयक दृष्टीकोण यावर तर बुद्धांचा खूप मोठा सकारात्मक व खोलवर असा परिणाम झालेला आहे. त्यांच्याइतकी समग्र क्रांती जगात दुसर्या कोणीही केलेली नाही.
हे सर्व ठीक आहे. पण याच्यापेक्षा एका वेगळ्या कारणासाठी मला बुद्ध आवडतात. हे कारण म्हणजे बुद्ध तुम्हाला, मला विचारस्वातंत्र्य देतात. ते तुमच्यावर, माझ्यावर, आपल्यावर विश्वास ठेवतात. बुद्धांचा संदेश आहे की, ‘अत्त दीप भव!’ म्हणजे स्वयंप्रकाशी हो! स्वतः दीपक बन! प्रकाशमय हो! अहाहा! किती सुंदर, रम्य, मोहक व सामर्थ्यशाली संदेश आहे हा!
मला आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेला संदेश कोणता असेल तर तो हाच आहे! तू स्वतः दीप हो! मला बुद्ध यांनी विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले. मी स्वत: माझ्या जगण्याचा मार्ग, दिशा शोधून काढू शकतो. एवढा विश्वास माझ्यावर त्यांनी ठेवला आहे, ही कल्पनाच माझ्यासाठी आनंददायी आहे! जगातील दुसर्या कोणत्याही धर्म संस्थापकाने इतक्या स्पष्टपणे व नि:संदिग्धपणे आपल्या अनुयायांवर, मानवावर इतका विश्वास ठेवलेला नाही. उलट अमुक धर्मग्रंथातील शब्दनशब्द खरा मानायला सांगितलेले आहे किंवा ते लिहिणाऱ्याचे असे ‘विश्वरूप दर्शन’ घडवले आहे की, त्याचे मत मान्य करणे हे तुमच्यावर, तुमच्याही नकळत बंधनकारक होऊन बसलेले आहे. बुद्ध असे करत नाहीत.
मी २०१६ साली धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे Adventure Campच्या निमित्ताने दहा दिवसांसाठी मुंबई विद्यापीठाच्या दहा विद्यार्थ्यांचा संघ घेऊन गेलो होतो. तिथे मी बौद्ध धर्मियांचे एक प्रसिद्ध प्रार्थनास्थळ पाहिले. त्याला मी भेट दिली. तेथे गौतम बुद्धांची भव्य अशी धातूची मूर्ती होती. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला एका चौकोनी पाटीवर पुढील दोन वाक्य लिहिलेली आहेत. ती अशी, “ओ भिक्षू तथा बुद्धिमान! जिस प्रकार रगड कर, काट कर, तथा पिघला कर सोने की परीक्षा की जाती है, उसी प्रकार मेरी शिक्षाओं की जांच करो और उन्हे स्वीकार करो. परंतु इसलिये नही कि तुम मेरा मान करते हो.” किती महान विचार आहे हा! जिथे जगातील सर्व धर्मगुरू, धर्मसंस्थापक “मेरे दिखाये हुए राह पर चलो”, असे म्हणतात, तिथे गौतम बुद्धांचा हा विचार त्यांना त्या सर्वांपेक्षा वेगळा सिद्ध करतो. आजच्या विज्ञानयुगात तर तो अधिक जास्त समर्पक वाटतो. या अशा विचारधारेच्या, स्वतंत्र प्रज्ञेच्या माणसांमुळेच माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे.
म्हणून बुद्ध मला आवडतात. बाकी काही नाही.
– राहुल रजनी
(जर आपणास माझे लेखन आवडत असेल तर खाली शेअर करण्यासाठी विविध पर्याय दिलेले आहेत, त्यावरून आपले मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना जरूर पाठवा. धन्यवाद!)
खूप छान सर.
निसर्ग हे सत्य आहे. यातूनच मला वाटते तथागत गौतम बुध्दांनी आपले महान विचार निर्माण केलेत. असे सत्य जे संपूर्ण डोळस आणि बुध्दीच्या कसोटीवर आधारलेले आहेत.
गौतम बुद्ध यानी दिलेल्या संदेशाने जगाला एका नव्या जीवन मार्गाची ओळख झाली. आजही त्या मार्गावर अनेक विचारवंत जात आहेत . आपणही त्या वैचारीक मार्गाचा अवलंब करीत हे विचार मांडले. हे उत्तम. आपण बुद्धाच्या अनेक विचारानसोबत त्यांच्या जीवनतत्वांचा परिचय करून देत लेखनीला बुरूज देत निरंतर लिहा.
धन्यवाद!
Buddhism is based on science. Buddhism is not a religion. Its Dhamma means way to live life. It believes in humanity, high human values, giving to others.
Buddhism is based on science. Buddhism is not a religion. Its Dhamma means way to live life. It believes in humanity, high human values, giving to others.
प्रेरणादायी…