चांगल्या आरोग्यासाठी

समाजाला डॉक्टरांइतकीच #आहारतज्ज्ञ व #फिटनेस_कोच यांची गरज आहे. आपल्या आजूबाजूला आरोग्याच्या बाबतीत जागरूक नसलेले लोक आढळतात. प्रत्येकाचं काही ना काही दुखत असतं. कुणाला #ऍसिडिटी असते तर कुणाला कोणता न कोणता त्रास असतो. आपल्याला असं वाटतं की जगणं असंच असतं. नेहमी काही ना काही दुखत असतं. पण खरंतर तसं नाहीये. जर आपण व्यवस्थित #व्यायाम केला, आहार व्यवस्थित ठेवला, पुरेशी झोप/ विश्रांती घेतली तर अशा तक्रारी खूप

म्हणजे खूप कमी होऊन जातात. जर आहारतज्ज्ञ आणि फिटनेस कोच, वेगवेगळे खेळ यांचे प्रमाण वाढले तर डॉक्टरांची संख्या आपोआप कमी होऊन जाईल. आपला डॉक्टर, गोळ्याऔषधी यांच्यावर होणारा खर्च खूप कमी होऊन जाईल. ज्या पदार्थामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो तो आपल्याच पैशाने विकत घेऊन खाणे आणि त्रास व्हायला लागल्यावर डॉक्टरांकडे जाणे हे काही सुज्ञपणाचे लक्षण नाहीये.

माझ्या आजूबाजूला असंख्य लोक मी बघत आहे त्यांची किंवा साडेसहा महिन्यांपूर्वी माझी स्वतःची #दैनंदिनीसुद्धा त्या प्रकारची होती. आपल्याला #आहारशास्त्र माहिती नसल्यामुळे आपण केव्हाही काहीही खातो. ज्या पदार्थांची शरीराला गरज नाहीये तेदेखील आपण भरमसाठ प्रमाणात खात राहतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असंख्य #आजार निर्माण होतात. काही लगेच डोके वर काढतात तर काही शरीरात साठून राहतात. खरंतर आपण आपल्या शरीराचे आभार मानायला हवेत. कारण ते अशा गोष्टी दीर्घकाळ सहन करत असते. लवकर आजार होऊ देत नाही. पण शरीरामध्ये हळूहळू आजार साठत राहतात. आतल्या आत ते वाढत राहतात आणि एके दिवशी अचानक त्यांचा स्फोट होतो. मग आपल्याला #हार्ट_अटॅक येतो, ऍसिडिटीचा अटॅक येतो, छातीत दुखू लागतं अशा बऱ्याच गोष्टी घडतात. या गोष्टी टाळणे खरंच खूप शक्य आहे. पण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या आजूबाजूला नाहीत आणि जे आहे ते इतके इतके कमी आहेत की ते वेडे आहेत असे आपल्याला वाटते. त्यांचे बोलणे आपण हसण्यावारी नेतो.

आपण आपल्या #टूव्हीलर, #फोरव्हीलरची वेळेवर सर्व्हिसिंग करतो, तिचे ऑइल पाणी वेळेवर करतो. का? कारण तिची, तिच्या इंजिनची लाईफ वाढावी म्हणून. पण स्वतःच्या शरीराची लाईफ वाढावी यासाठी आपण फार काळजी घेत नाही. आपण आपल्या #पेट्रोल_कारमध्ये डिझेल किंवा रॉकेल टाकत नाही. पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्यास गाडी पुढे काही मिनिटांमध्ये थांबेल व बंद पडेल. तिचे इंजिन लॉक होईल. शरीर असे लगेच लॉक होत नाही. म्हणून आपल्याला असे वाटते की, आपण काहीही खाल्ले तरी शरीरावर काहीच फरक पडत नाही. इथे #catastrophe_theory काम करते. या सिद्धांतानुसार कारणांचा परिणाम लगेच दिसून येत नाही. तो हळूहळू होत राहतो. पण त्यानंतर अचानक तीव्र परिणाम दिसायला सुरुवात होते.

आता प्रत्येक गोष्टीचा अतिरेक चालू आहे. आपल्या लाखो वर्षातल्या पूर्वजांनी कधीही एवढे मोठमोठे #आवाज ऐकले नाहीत. आपण ते ऐकत आहोत. त्यामुळे आपले कान खराब होत आहेत. कान फक्त एक अवयव नाहीये. तो शरीराचा तोल सांभाळतो. त्यामुळे आपण स्वावलंबी राहू शकतो. कान हा डोळ्यांपेक्षा पावरफुल असतो. कारण डोळ्यांनी आपल्याला १८० अंशात दिसू शकते. पण कानांनी आजूबाजूला कुठेही काही घडले तरी आपल्याला ते ऐकायला येते.
आपल्या हजारो लाखो वर्षाच्या पूर्वजांनी कधीही इतके #गोड खाल्ले नाही जेवढे आपण आज खात आहोत. त्यामुळे आपले दात खराब होत आहेत. आता पुन्हा दात फक्त एक अवयव नाहीये. तर पूर्ण शरीराचे आरोग्य त्यांच्यावर अवलंबून असते. आपले #सौंदर्य त्यांच्यावर अवलंबून असते. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, यावरील माझा विश्वास हळूहळू उडत चाललेला आहे. आपण फक्त अनुकरणशील प्राणी आहोत. ते अनुकरण करताना आपण चांगल्या गोष्टींचे अनुकरण करत आहोत की वाईट हे आपल्याला कळत नाही. कळले तरी वळत नाही. आज आपण #मल्टिनॅशनल_कंपन्यांचे गुलाम झालेलो आहोत. ते जाहिराती, चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्यामध्ये गुंतवणूक करून त्यांच्या वस्तू विकल्या जातील या प्रकारचे समाजवास्तव आपल्याला दाखवत आहेत. आपण त्यांचे अनुकरण करत आहोत.

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *