चुंभळ
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.
भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.

