मुंबईच्या काही आठवणी

माझ्या वडिलांची ३५ वर्षे मुंबईच्या कांदिवलीतील लक्ष्मीनगर, हनुमान नगरमधील झोपडपट्टीत गेली आहेत. मला त्या जीवनाचा चांगला अनुभव आहे. मला नोकरी लागल्यावर व पगार चालू झाल्यावर २०१३मध्ये त्यांनी मुंबई सोडले. माझ्या वडिलांना

गावी परत आणणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते.

ठाकूर कॉलेज, समता नगरच्या बाजूला लक्ष्मीनगर आहे. अर्थात तेव्हा ते महाविद्यालय व ठाकूर गावही नव्हते. महामार्गापर्यंत मोकळे रान होते. तेथून ये जा करणारी वाहने दिसायची, त्यांचा आवाजही यायचा. आता मात्र ३०- ४० मजली शेकडो – हजारो अपार्टमेंट, टॉवर्स, ठाकूर महाविद्यालय, ठाकूर गाव (गाव कसले? गावात काही ५०- ६० मजली अपार्टमेंट असतात का?) आहे. महामार्गावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी होती. आजही असेल. दुसऱ्या बाजूला एक डोंगर होता. खडी/ कपची तयार करण्याची एक मोठी मशीन लक्षीनगरच्या बाजूला होती. रात्रंदिवस तिचा आवाज चालू असायचा व मोठमोठ्या ट्रॅका, डंपर यांची ये जा चालू असायची. खडी/ कपची तयार करण्यासाठी रात्रंदिवस तो डोंगर पोखरणे चालू होते. आता तो डोंगर आहे की नाही कुणास ठाऊक! त्याच्या पलीकडे खानदेश आहे, पण तो ओलांडता येत नसल्याने रेल्वेने फिरून म्हणजे त्याला वळसा घालून जावे लागते, असे तेव्हा माझ्या बालमनाला वाटायचे.

माझ्या बालपणी दर सुट्ट्यांमध्ये मी मुंबईला वडिलांकडे यायचो. तेव्हा खूप पायी फिरायचो. काही काम असेल, स्वस्तात कपडे खरेदी करायचे असतील तर आम्ही लक्ष्मीनगरपासून कांदिवली बस स्टँड अथवा रेल्वे स्थानकापर्यंत पायी पायी चालत जायचो. तेवढेच बस भाडे वाचायचे. तेव्हा पैसे वाचवण्यासाठी वेळेचा व श्रमाचा असा वापर करायचो. तेव्हा मी लहान असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ होता. फक्त माझ्या वडिलांकडे नव्हता. १०- १२ तास कंपनीत काम करण्यात व प्रवासात जायचे. असो. अजून बऱ्याच आठवणी आहेत. पुन्हा कधीतरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *