मित्रांनो,
अवांतर वाचन करावे म्हणजे नेमके काय करावे, कसे करावे, काय वाचावे, केव्हा वाचावे, त्याचे फायदे काय आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तेव्हा हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
अवांतर वाचन म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्या त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तर गृहस्थ म्हणून आपल्या दैनंदिन नोकरी-व्यवसायाच्या कामाव्यतिरिक्त वर्तमानपत्र, त्यातील महत्त्वाच्या
बातम्या, लेख, संपादकीय, शनिवार-रविवारची पुरवणी, चांगल्या दर्जाच्या कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, चरित्र, आत्मचरित्र, सोप्या भाषेतील वैचारिक लेख, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इ. स्वरूपाचे ललित व ललितेतर साहित्याचे वाचन करणे म्हणजे अवांतर वाचन करणे होय.
या वाचनाचे स्वरूप-
विद्यार्थ्यांनी हे वाचन दररोजच्या अभ्यासाच्या वेळेव्यतिरिक्त वेळ काढून दररोज नियमितपणे करायचे असते. तसेच जे नोकरी किंवा व्यवसाय करत असतात त्यांनी त्यांच्या कामाच्या वेळेव्यतिरिक्त वेळ काढून अवांतर वाचन करायचे असते. परीक्षा जवळ आली की हे वाचन तेवढ्या दिवसांपुरते थांबवले तरी चालते.
झोपेच्या आधी, चहा पिताना, रिकाम्या वेळेत कोणतेही दडपण न घेता हे वाचन करता येते.
अवांतर वाचनासाठी पुस्तके स्वतः विकत घेतली तर उत्तमच. पण पैशांअभावी ते शक्य नसेल तर एखाद्या ग्रंथालयात खाते उघडून तेथून पुस्तके आणून ती वाचायला हवीत व वाचून वेळेवर परत करून पुन्हा नवीन पुस्तके आणायला हवीत. व्हॉट्सअप, फेसबुकवरील मॅसेज वगैरे वाचणे म्हणजे अवांतर वाचन नव्हे. कारण दोन मॅसेज व लेखांमध्ये बऱ्याचदा काहीही संबंध नसतो. पुस्तकातून आपल्याला त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान विविध पैलूंसह मिळत असते. एखादा विषय पूर्ण कळत असतो. म्हणून पुस्तकं वाचायला हवीत. त्यात पुन्हा पुस्तकं अपूर्ण वाचून ठेवायला नको. कारण अपूर्ण ज्ञान हे बऱ्याचदा धोकेदायक ठरत असते.
वाचनात नियमितता, सातत्य असले तर ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे काही वर्षांनंतर आपले
भरपूर वाचन होऊन जाते. इतके की ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. फक्त सुरुवात करणे गरजेचे असते.
फायदे-
● विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचा त्यांच्या विद्यार्थी जीवनात भरपूर फायदा होत असतो.
● अवांतर वाचनामुळे वाचनाचा वेग हा खूप वाढत असतो. त्यामुळे आपला अभ्यास, उजळण्या अतिशय कमी वेळेत पूर्ण होत असतात.
● अवांतर वाचनामुळे आपल्या माहितीत, ज्ञानात भर पडते. आपली समाज, माणूस, व्यवस्था इ. बद्दलची समज वाढते. त्याचा फायदा हा आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातील विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी होतो. तसेच समाजात वावरताना, जगताना, कोणतेही काम करताना आयुष्यभर होत असतो.
● अवांतर वाचनामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो. भाषेवर प्रभुत्व प्राप्त होते. कोणत्याही विषयावर आपले मत, आपले विचार, भावना आपल्याला इतरांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात. चार चौघांमध्ये आपले बोलणे प्रभावी ठरते. आपण चांगले लिहू शकतो. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व परीक्षेतील उत्तरे लिहिताना आपल्याला या गोष्टींचा खूप फायदा होतो.
● अवांतर वाचनामुळे आपल्याला विविध काळातील, प्रदेशातील गोष्टी माहीत झाल्यामुळे आपल्याला नवनवीन विचार, कल्पना सुचू लागतात. त्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात, नोकरी, व्यवसायात करू शकतो.
● या सर्व गोष्टींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येतो. आपला आत्मविश्वास वाढतो. सभाधीटपणा प्राप्त होतो.
● अवांतर वाचनामुळे आपली आकलनशक्ती वाढते. त्यामुळे आपल्याला कोणताही विषय समजून घ्यायला खूप सोपे जाते. कारण आपले दररोज थोडे थोडे करून विविध विषयांवरचे खूप वाचन झालेले असते. त्याचा फायदा आपल्याला कोणत्याही विषयाचे, प्रसंगाचे चटकन आकलन करून घ्यायला होत असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये, व्यवसायामध्ये होत असतो.
● यातून आपल्या हातून चांगले लेखन होऊ शकते. आपल्याला करिअरची वेगळी दिशा मिळू शकते.
● कोणतीही नवीन गोष्ट आपल्याला इतरांच्या तुलनेने लवकर शिकता व आत्मसात करता येते.
● विविध विषयांचे, समाजाचे, मानवी स्वभावाचे ज्ञान, वाचनाचा वेग, भाषेवर प्रभुत्व इ.मुळे आपल्याला आयुष्यात इतरांपेक्षा अधिक लवकर व काहीएक अचूक निर्णय घेणे शक्य होते. आयुष्यात माणसाला नेहमीच कोणते ना कोणते छोटे-मोठे निर्णय घ्यावेच लागतात. तेव्हा अवांतर वाचन हे आपल्याला किती उपयुक्त ठरू शकते, याची आपण कल्पना करू शकता!
● अवांतर वाचन हे कोणतेही दडपण, दबाव न घेता आपण सहज करत असल्यामुळे आपल्याला एक वेगळा आनंद दररोज मिळत असतो. यासाठी आपल्याला फार पैसे खर्च करण्याची गरज नसते व हा आनंद आपल्याला जगण्यासाठी टॉनिक ठरत असतो. आपल्याला एक वेगळी अनोखी ऊर्जा मिळत असते. यामुळे आपण एक माणूस म्हणून समृद्ध होत असतो.
म्हणून अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना अवांतर वाचनाची सवय लावा. तुम्हाला आतापर्यंत ही सवय व आवड नसेल तर ती सवय लावून घ्या.
© डॉ. राहूल पाटील
(या लेखाखाली प्रतिक्रिया देऊन तुम्ही अजून भर टाकू शकता.)
(माझा एक Youtube Channel आहे. ज्यावर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध विषयांवरील ३००+ व्हिडीओ आहेत. त्याची लिंक – https://youtube.com/playlist?list=PLkOQhRd-rhyNpGo4BtAuqDE-3N8Ttj9PE
तसेच माझ्या नेहमी संपर्कात राहण्यासाठी व बीए, एमए, नेट, सेट, पेट, पीएचडी इ. विषयांवरील अभ्यास साहित्य मिळविण्यासाठी माझ्या telegram ग्रुपला जॉईन व्हा. लिंक – https://t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only