आम्ही तेव्हा हिंदू नव्हतो का?

         ज्या काळात सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी इथल्या उच्चवर्णीय मनूवाद्यांना निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज नव्हती, तेव्हा हजारो जाती निर्माण

करून, त्या टिकवून भारतीय समाजाची हजारो शकले केली व लोकांवर राज्य केले. त्यांचे प्रचंड शोषण केले. ते आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, यासाठी धर्माचा आधार घेऊन अनेक नियम तयार केले. त्यांना प्रचंड बंधनात ठेवले. तेव्हा ते हिंदू आहेत म्हणून त्यांची दयामाया केली नाही.

          आता लोकशाही असल्याने सत्तेवर येण्यासाठी निवडणुका लढवून निवडून येण्याची गरज आहे. म्हणून हिंदू कार्ड खेळत आहेत. आदिवासींना तसेच पूर्वाश्रमीचे शूद्र, अतिशूद्र यांना पण कट्टर हिंदू बनवत आहेत.

         आदिवासी, पूर्वाश्रमीचे शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांनादेखील एक समाज म्हणून स्वतःचे ध्येय नसल्याने, मनुवाद्यांनी लादलेल्या स्वतःच्या समाजाच्या गुलामगिरीचा इतिहास, गुलामगिरी येण्याची कारणे माहिती नसल्याने ते स्वतःहून जुने दिवस परत आणण्यासाठी आतुर झालेले आहेत.

            मनुवादी पुन्हा राजसत्ता स्वतःच्या हातात ठेवण्यासाठी कालबाह्य, निरर्थक रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांडे, पोथी पुराणे यांचा आधार घेत आहेत व पर्यायाने देशाचे व समाजाचे प्रचंड मोठे नुकसान करत आहेत. हे अजूनही स्त्रिया, पूर्वाश्रमीचे शूद्र, अतिशूद्र, आदिवासी यांच्या लक्षात येत नाहीये.

          राजकीय पक्ष, पुढारी स्वतः लाखो रुपये खर्च करून तीर्थयात्रा, पदयात्रा, बाबा बुवांची प्रवचने, सप्ताह, यात्रा, सण-उत्सव यांचे आयोजन करत आहेत. वेगवेगळी मंदिरे बांधत आहेत. याला काही लोकं समाजसेवा समजतात. ही समाजसेवा नाहीये. तर लोकांना एक प्रकारची नशा लावली जात आहे.

            अशाने सर्वसामान्य माणसांच्या हिताची ही लोकशाही राहणार नाही.

– डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *