बाहुलीचा मृत्यू –

बाहुलीचा मृत्यू

         ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील ‘बाहुलीचा मृत्यू’ हा लेख एका बत्तीस वर्षाच्या कुमारी मातेच्या मृत्यूनंतर लेखकाच्या झालेल्या मानसिक अवस्थेवर, तिच्याबद्दलच्या आठवणींवर आधारलेला आहे. लेखकाने तिचे नाव दिलेले नाही. तो फक्त ‘ती’ अशा सर्वनामाने तिचा उल्लेख करतो. लेखक तिच्यावर अंत्यसंस्कार करून परतलेला आहे आणि तेव्हा त्याच्या तिच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या लेखकाने या लेखात मांडल्या आहेत.

            गेल्या १२ वर्षांपासून लेखकाची व तिची भेट झालेली नव्हती. तिचा काही निरोप पण लेखकाला मिळालेला

नव्हता. पण अचानक ती आजारी असल्याचा आणि फादरचा मृत्यू झाल्याची बातमी लेखकाला वहीदकडून कळते व त्यांना तातडीने निघून येण्याविषयी वहीदचे पत्र लेखकाला मिळते व म्हणून लेखक तिथे गेलेला आहे. तेव्हा तिचा मृत्यू झालेला असतो.

              लेखक लहानपणी ‘ती’च्या वडिलांकडे (रॉयचॅटर्जी) राहायचे. म्हणजे लेखक ‘ती’च्यासोबत लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांचे व रॉयबाबू यांचे खूप जवळचे नाते असल्याचे दिसून येते. कारण रॉयबाबू यांची अशी इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा लेखकाच्या हातूनच गंगेच्या पाण्यात विसर्जित केली जावी. पण पुढे काय होते कुणास ठाऊक त्या वहीदच्या हस्ते विसर्जित केल्या जातात. ‘ती’चे वडील वारल्यावर ती फादरसोबत त्या आवारातच राहू लागते. हा वहीदही तिच्यासोबत राहू लागतो.

             चर्चच्या परिसरात हॉस्पिटलही होते. याचा उल्लेख ‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ व इतर काही लेखांमध्ये आलेला आहे. हिचा संबंधही त्या हॉस्पिटलशी यायचा. ती ऑपरेशन थिएटरमधून घरी न जाता रेस्टॉरंटला जायची व तिथे ती वर्तमानपत्रे वाचता वाचता कॉफी प्यायची. लेखक तेव्हा तिच्यासमोर जाऊन बसत असे. पण त्यांचे जास्त बोलणे होत नसे. लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे “तिचे रूप असामान्य होते. सगळ्या देहावर चांदणे शिंपडावे तशी ती दिसत असे.” (पृ. ४८) पुढे तारुण्यात आल्यावर लेखक तिच्याशी लग्नाविषयी बोलले होते. पण तिने लेखकाला काहीही उत्तर दिले नव्हते. मात्र त्या दिवशी ती उशिरापर्यंत फिडल (एक वाद्य) वाजवत होती. पण यातून तिच्या मानसिकतेचा कोणताही अंदाज आलेला दिसत नाही. तिचे लेखकावर प्रेम होते की नाही ते कळत नाही. परंतु लेखक तिच्यामध्ये खूप गुंतलेला होता, असे दिसून येते. एके ठिकाणी लेखक असे म्हणतो की, “माझ्यावर तसूभरही प्रेम न करता तिने मला असे गुंतवून ठेवले.” (पृ. ४७) म्हणजे लेखकाच्या मते तिचे लेखकावर प्रेम नव्हते. पण लेखक मात्र तिच्यात गुंतलेला होता.

              पुढे लेखक ते हॉस्पिटल सोडून दुसरीकडे निघून जातो. तेव्हा कित्येक वर्षांनी तिला मूल होऊन वारल्याची हकीकत लेखकाला कळते. त्यात लेखकासाठी सर्वात धक्कादायक म्हणजे तिचे लग्न झालेले नसते व तिला कुणापासून मूल झालेले आहे किंवा त्या मुलाचा बाप कोण आहे हे फादर व वहीद यांनाही माहीत नसते. यावर लेखकाची मानसिकता त्याने स्वतः वर्णन केलेली आहे. ती अशी की, “मी उद्ध्वस्त होऊन गेलो होतो. मुख्य म्हणजे, एक प्रकारच्या घृणेने मला अंतर्बाह्य वेढून घेतले होते. तिच्यासंबंधीचे अतूट आकर्षण आणि तिच्यासंबंधीची किळस यांच्या आवर्तनात मी सापडलो होतो… दु:ख आणि निराशेने माझे हृदय व्याकूळ झाले होते.” (पृ. ४८) लेखकाने तिला लग्नाची मागणी घातली होती. पण तिने अप्रत्यक्षपणे ती नाकारून दुसऱ्याशीच शारीरिक संबंध ठेवले होते, यामुळे लेखकाला तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण झालेला दिसून येतो. तरी तो तिच्या अंत्यसंस्कारासाठी जातो.

                 तिला कसला तरी आजार झालेला होता. ती लवकरच मरणार आहे, याची तिला जाणीव झालेली होती. मृत्यूनंतर तिने तिचा सगळा पैसा आणि मालमत्ता चर्चच्या स्वाधीन केलेली होती. तिची दोन आवडती पर्शियन मांजरे तिने वहीदला दिली. पण लेखक तिच्यासोबत लहानपणी राहिलेला असूनही तिने लेखकासाठी कोणताही निरोप किंवा आठवण म्हणून एखादी वस्तू ठेवलेली नव्हती. तिच्या सर्व वस्तूंची विल्हेवाट लावल्यावर तिचे फिडल तेवढे बाकी होते. वहीदने ते लेखकाला दिलेले आहे. तिची तेवढीच आठवण आता लेखकाकडे असणार आहे.

           तिच्या अंत्यसंस्कारावरून परतल्यानंतर लेखकाला रॉयबाबूंची खूप तीव्रतेने आठवण येत होती, त्यांना त्यांचे आभास होत होते. याचे वर्णन लेखकाने केलेले आहे.

          शेवटी माणूस, त्याचे मन, त्याच्या भावना या खूप गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. कोण कुणाला व का आवडेल, कोण कुणाला व का स्वीकारेल, कोण कुणाला व का नाकारेल, कोण कुणासाठी का झुरेल, कोण कुणामध्ये का गुंतेल, हे कुणीही सांगू शकत नाही. माणसाच्या मनात अनेक नाजूक कोपरे असतात. त्यात अनेक व्यक्ती वेगवेगळ्या निमित्ताने ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यांचे मृत्यू, त्यांचे निर्णय हे त्यांच्यात गुंतलेल्या व्यक्तीच्या जीवनावरदेखील काहीएक परिणाम करून जातात. याचेच वर्णन या लेखात ग्रेस यांनी स्वानुभवावरून केलेले आहे.

 

– डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *