आई – ‘माझं घर’ या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा

         आई म्हणजे विभाची सासू व दिनेशची आई. ही एक वृद्ध विधवा स्त्री आहे. आधी ती गोरेगाव येथे राहायची. पण नंतर मुलगा व सून यांनी अंधेरीमध्ये फ्लॅट घेतल्यावर ती त्यांच्यासोबत तिथे राहू लागते. पण तरीही अनेकदा ती गोरेगावला जुन्या घरी जाते व तिथल्या बायकांमध्ये मिसळते. विभा ही त्यांची सून असली तरी दोघांमधील नाते हे आई व मुलीसारखेच आहे. विभा त्यांना आईच म्हणते. विभा त्यांची तब्येत, औषध, पथ्ये यांची खूप काळजी घेत असल्यामुळे त्या विभावर अवलंबून आहेत. विभा आधी दिनेश येईपर्यंत जेवणासाठी थांबायची, तेव्हा आईच तिला

वेळेवर जेवून घ्यायला सांगतात. तिने सगळ्यांसोबत स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे त्यांना वाटते. दिनेश जेव्हा विभाशी घटस्फोट घ्यायचे ठरवतो. तेव्हा त्यांना खूप दु:ख होते व त्याचा रागही येतो. त्या दिनेशला बोलावून घेतात व खडसावतात. पण जेव्हा तो ऐकत नाही. तेव्हा मात्र त्यांचा नाईलाज होतो. त्यांचा राणीमध्ये (नात) खूप जीव असतो. सकाळी नातीची तयारी करून देणे, तिला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणे इ. कामे नेहमी त्याच करत असतात. विभा, राणी यांच्यासोबत त्यांचे खूप व्यवस्थित चाललेले असते. त्यामुळे विभा माहेरी गेल्यावर त्यांना एकटे वाटू लागते. 

           विभा जेव्हा सासरी परत येते तेव्हा तिचा आपल्या मुलापासून घटस्फोट होणार आहे हे माहीत असूनही त्या विभाला आपले दागिने देतात. विभा जेव्हा त्या घरावर हक्क सांगते, तेव्हा त्या विभाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात. दिनेशला घर सोडून जायला सांगतात. दिनेश जेव्हा आईला सांगतो की, विभाला इथून जायला सांग, तेव्हा त्या ठामपणे म्हणतात की, “ती जाणार नाही. ती इथेच राहील. ती नसेल तर ह्या घराला घरपण नाही. मलाही मग इथे राहायचे नाही. तू तिला जायला सांगत असशील तर तिच्याबरोबर मी जाईन. पण न्यायाची गोष्ट हीच आहे की, तू इथून निघून जावंस. (त्याने का? असे विचारल्यावर) कारण लग्न तुला करायचंय. तुझ्या सुखासाठी तिने का सगळ्यावर पाणी सोडावं? ती आता इथून कुठेही जाणार नाही. मी तिच्याबरोबराय. दिन्या तू इथून निघून जा.” (पृ. ५५) अशा पद्धतीने त्या विभाची मानसिकता, तिची बाजू, तिचे दु:ख, यातना समजून घेतात व तिची बाजू न्यायाची असल्याने त्याच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहतात. 

          दिनेश नंदिताशी लग्न करतो, त्यानंतर काही दिवसांनी नंदिताच्या पोटात ट्युमर आल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागते. तेव्हा दिनेश तिच्यासोबत दवाखान्यात थांबण्यासाठी आईची मदत मागतो. पण त्या त्यासाठी नकार देतात व संतापाने म्हणतात की, “लाज वाटत नाही त्याला इथे फोन करायला? इथून कुणीही येणार नाही म्हणावं तुझ्या मदतीला. तोडून गेलायस ना, तुटलेलाच रहा म्हणावं.” (पृ. ६५)  अशी भूमिका त्या घेतात. मात्र पुढे दिनेशला मुलगा झाल्यावर त्यांना आनंद होतो. त्या बाळंतीण बाई व मुलाची काळजी घेण्यासाठी ८-१० दिवस तिकडे जातात. पण परत विभाकडेच येतात.

          पुढे त्या दिनेशला ते घर विभाच्या नावावर करायला सांगतात. या संदर्भात दिनेश व त्यांच्यात जे संवाद झाले आहेत, ते स्त्रियांच्या कायदेशीर हक्कांशी संबंधित आहेत. दिनेश जेव्हा ‘मी त्या घरावर कधीही हक्क सांगणार नाही, असा शब्द देतो’, असे म्हणतो. तेव्हा त्या “शब्द नको. कायदेशीर हक्क दे.” असे म्हणतात. पुढे त्या म्हणतात की, “तुम्ही सगळेच स्वार्थी आहात रे. सगळे पुरुष. काही देत नाही बाईला स्वतःहून. म्हणून कायदेशीर हक्क मागवा लागतो.” (पृ.८१) घर घेताना विभा व दिनेश या दोघांनी मिळून कर्ज घेतले होते. विभासुद्धा कर्जाचे हप्ते फेडत होती. मग हे घर तिच्या नावावर घ्यावं, असं का वाटलं नाही तुला? असा प्रश्न त्या विचारतात. घर नावावर करायचा मला विचार करावा लागेल, असे दिनेशने म्हटल्यावर त्या “आता बरोबर गेलास जातीवर. हातून नाहीच सुटायचे तुमच्या सहजपणे काही.” (पृ. ८२) पुरुषांचे हे वास्तव त्या मांडतात. दिनेशला त्या म्हणतात की, तुला उद्या मुलगा झाला तरी राणी ही तुझ्या संपत्तीतील निम्मी वाटेकरी ठरेल. पण तिचा वाटा तिला कुणी काढून देणार नाही. तिला कायदा हातात घेऊन लढावे लागेल आणि न भांडता दिले तरी देणारा उपकाराच्या भावनेतून देईल. हे उपकार कशाला हवेत? अशी ठाम भूमिका त्या घेतात. 

          त्या अशी भूमिका घेत आहेत कारण त्यांना त्यांच्या भावांकडून तसा अनुभव नुकताच येऊन गेलेला असतो. त्यांच्या भावांची वाटणी होणार असते. तेव्हा त्यांना बहिणींकडून ‘वाडवडिलांच्या इस्टेटतलं आम्हाला काहीही नकोय. मी माझे अधिकार स्वेच्छेने सोडतेय. भावांच्या नावावर ते करायला, माझी हरकत नाही’, असे नाहरकत प्रमाणपत्र हवे असते. भावाचे पत्र आल्यापासून त्या विचार करत असतात की, “म्हणजे बायकांच्या बाजूचे कायदे करायचे आणि त्या कायद्यालाच अशी भोकं पाडायची?… एकाच आईच्या पोटी जन्माला आलो ना दोघेही? माझ्या नवऱ्याचं होतं ते मुलाचं झालं आणि बापाचं होतं ते भावाचं झालं, माझं कायाय मग?” (पृ. ८२) असा अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडतो. राणीचीही पुढे अशीच अवस्था होईल, अशी रास्त भीती त्यांना वाटते. त्यामुळे त्या दिनेशला ते घर विभाच्या नावावर करायला सांगतात. 

         आई विभाच्या पाठीमागे शेवटपर्यंत भक्कमपणे उभ्या राहतात. त्याला कारण म्हणजे विभाची बाजू न्यायाची असते. तसेच ती आईंची स्वतःच्या आईप्रमाणे सर्व काळजी घेत असते. ही कारणे तर आहेतच. पण अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे दिनेश लहान असताना त्या स्वतः अशा परिस्थितीतून गेलेल्या असतात. त्यांचा नवरा जेव्हा दुसरी बायको करायला निघाला होता. तेव्हा त्यांची सासू किंवा सासरा यापैकी कुणीही त्यांच्या बाजूने उभे राहिले नव्हते. उलट त्यांच्या बघण्यातून यांना असे जाणवत होते की, “सटवे तुझ्यातच कायतरी कमी असणार, म्हणून तो निघाला.” (पृ. ८४) विभाच्या वाट्याला ज्या वेदना, जो चोरटेपणा आलेला असतो, ते सर्व आईनेही भोगलेले असते. त्या म्हणतात की, “अरे, इथे काळजात कळ गेली हिने घटस्फोटाचं सांगितलं तेव्हा. कशा आतून सुऱ्या फिरून रक्तबंबाळ झालं असेल तिचं मन ते मला ठाऊकाय.” (पृ. ८४) म्हणून त्या विभाच्या बाजूने उभ्या राहतात. 

      अशी कुटुंबवत्सल, आपल्या आजूबाजूच्या सर्वांवर प्रेम करणारी, मात्र न्यायाची सत्याची बाजू घेणारी, त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी, पुरुषप्रधान व्यवस्थेचे आकलन झालेली व म्हणून स्वतःच्या मुलाकडून सूनेला घराचा हक्क मिळवून देणारी, आपल्या सुनेचे दु:ख समजून घेणारी एक वृद्ध पण कणखर स्त्री आईच्या स्वरुपात जयंत पवार यांनी उभी केलेली आहे. 

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *