जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकातील विभाची व्यक्तिरेखा

            विभा ही ‘माझं घर’ या नाटकातील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे. संपूर्ण नाटक हे तिच्याभोवती फिरते. ती दिनेशची पत्नी आहे. ती मुंबईतील अंधेरी या उपनगरात एका उच्चभ्रू लोकांच्या भागात एका चांगल्या फर्निचर केलेल्या टू बेडरूम किचनच्या फ्लॅटमध्ये दिनेश, मुलगी व सासुसोबत राहते. त्या आधी ते गोरेगावात राहायचे. ती चर्चगेटला नोकरी करते. ती साधारणतः ३४-३५ वर्षांची असून तिच्या माहेरी पुरोगामी वातावरण होते. तिचे वडील नाना हे पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्य केले व ते भेदभाव मानत नसत. अशा वातावरणात तिचे बालपण व तारुण्य गेले. ती उच्चशिक्षित आहे. तिने कॉलेजचे शिक्षण घेतलेले आहे. कॉलेजमध्ये असताना तिला सतार खूप छान वाजवता यायची. ती गाणेही शिकलेली होती. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ती

दोनदा विजयी झाली होती. हे तिच्या भावाच्या मधूच्या बोलण्यावरून आपल्याला कळते. अशी तिची एकूण जडणघडण झालेली आहे.

           तिचे लग्न दिनेश म्हात्रे याच्याशी झालेले असून तो चित्रकार आहे. तसेच तो एक जाहिरात कंपनी चालवतो. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झालेली आहेत. त्याचा व्यवसाय, तिची नोकरी यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे दिसते. म्हणून ते अंधेरीमध्ये फ्लॅट घेऊ शकले. त्यांनी त्या फ्लॅटसाठी कर्ज घेतलेले असून विभा ही नवऱ्यासोबत स्वतःदेखील त्या कर्जाचे नियमितपणे हप्ते फेडते. याचा अर्थ ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. कमवती आहे.

          विभा ही नोकरी करणारी महिला आहे. मुंबई या महानगरात ती राहते. नोकरीसाठी अंधेरी ते चर्चगेट अशी ये-जा करते. सकाळी घरातील सर्व आवरून जाते. संध्याकाळीसुद्धा स्वयंपाक, भांडीकुंडी धुणे, इ. सर्व कामे ती मनापासून करते. या सर्व कामांमध्ये तिची झोपसुद्धा पूर्ण होत नाही. म्हाताऱ्या सासूची पूर्ण काळजी ती घेते. सासूचे औषधपाणी, पथ्ये इ. सर्व ती करते. तिला आठ वर्षाची मुलगी आहे. तिच्या शाळेत पालकांना बोलावले तर दिनेश कधीही जात नाही. विभाच अर्ध्या दिवसाची रजा टाकून जात असते. ती तिच्या नणंदेला सुद्धा खूप जीव लावते. तिच्या एम. एस्सी.च्या प्रवेश शुल्कासाठी स्वतःच्या बांगड्या गहाण ठेवते. ती मुंबईहून खूप लांब कोल्हापूरला नोकरीला जायचे ठरवते, तेव्हा घरातून आई व दिनेशचा विरोध असताना विभा तिच्या पाठीशी उभी राहते.

           असे असूनही लग्नाला दहा वर्षे होत आली तेव्हा तिचा नवरा दिनेश हा मागील सहा महिन्यांपासून नंदिता मुर्डेश्वर नावाच्या एका मुलीच्या संपर्कात येतो व तिच्या प्रेमात पडतो. तेव्हापासून तो विभाशी नीट बोलत नाही, वागत नाही, चिडचिड करतो. चहा-नाश्ता वेळेवर मिळाला नाही, कुणाचा फोन आल्यावर तो नंबर व्यवस्थित लिहून ठेवला नाही तर तिला टाकून बोलतो, अपमान करतो. रात्री घरी वेळेवर येत नाही. ती त्याच्यासाठी जेवायला थांबते. पण तो बऱ्याचदा बाहेरूनच जेवून येतो. हे सर्व विभा मुकाट्याने सहन करते. तिला असे वाटते की, व्यवसायात मंदी आहे, इतर अडचणी आहेत, म्हणून तो असा वागत असेल. हे सर्व पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रयोगात आपल्याला बघायला मिळते.

           आपला नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. हे तिच्या कधीच लक्षात येत नाही. पण एके दिवशी दिनेश तिला म्हणतो की, गेल्या १० वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा आढावा घेतल्यावर फक्त चिडचिड, घुसमट व मन:स्ताप हाती लागतो. ती संसासात पूर्णपणे रमून, हरवून गेली असून तिचे त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही. यातून बाहेर पडण्यासाठी  तो घटस्फोट घेण्याचे सांगतो. तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. ती त्याला “तुला बोलावलं कसं रे …इतकी मी नकोशी झालेय? टाकाऊ घाण कचरा झालेय? (त्याचे दोन्ही हात घेऊन आपल्या गालांवर मारत-) मला मार हवं तितकं… काढ तुझा राग…पण असं बोलू नकोस. … का असा तोडून टाकायला निघालायस तू? (रडत)… माझं काय चुकलं सांग… मी बदलेन. तू म्हणशील तशी राहील…(पृ. २६, २७) असे म्हणत हात जोडते, स्वतःची, राणीची शपथ घालते, रडते. तरीही तो जेव्हा ऐकत नाही तेव्हा “खून कर माझा शांतपणे. ही… ही (राणी) झोपलीयना तिचा गळा आवळ शांतपणे” (पृ. २७), असे म्हणते. तो जेव्हा त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी सांगतो तेव्हा ती खूप पिसाळते. तू माझा विश्वासघात केलास, असा आरोप करते. अशी तिची एकूण त्यावर प्रतिक्रिया असते. यानंतर तिचे व्यवस्थित चाललेले आयुष्य पार बदलून जाते.

        विभाची सासू व नणंद उर्मिला या दिनेशची समजूत काढतात. तरीही तो घटस्फोट घेण्यावर ठाम राहतो. तेव्हा मात्र तिचा नाईलाज होतो व अशा परिस्थितीत सर्व महिला माहेरी जातात, तशी तीही माहेरी जाते. तिथे एक महिना राहिल्यावर तिला जाणीव होते की, माहेरचे घर हे तिचे घर नाही. ते तिच्या आईचे आहे. मग ती सासरी येते व त्या घरावर स्वतःचा हक्क सांगते. त्या वेळेस ती जे म्हटलेली आहे, ते सर्व स्त्रियांच्या भावभावनांवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणते, “नेमप्लेट दारावर तुझी पण आतलं घर माझं आहे. मी माया लावलेलं. मी उभं केलेलं. हे किचन माझं आहे. इथल्या प्रत्येक भांड्यावर माझं नाव आहे. प्रत्येक वस्तू मी माझ्या आवडीने, माझ्या मर्जीने घेतलीय. घरातला एकेक चमचा घेतानाही मी दोन-पाच रुपयांची घासाघीस करून घेतलाय. तिकडे गेले रे मी… आणि कुठे जाणार? नवऱ्याने टाकलेली बाई आधी बापाकडेच जाणार ना? राहिले मी तिथे महिनाभर…पण अवघडून गेले. पावलापावलावर ठेचकाळत राहिले. ह्यापूर्वी असं नव्हतं कधी वाटलं… आई म्हणायची, कुशे असं काय करतेस! हे तुझचाय गं सगळं… (मान हलवते-) नाही… माझं नव्हतं रे ते काही. मला कळायचं, ते माझं नाही. आतूनच कुठूनतरी जाणवतं. डब्यांवर, ताटवाट्यांवर तिचं नावाय… त्यांच्यावरून तिचा हात फिरलाय. त्या भांड्यांचे काठ, गाद्यांच्या वळकट्या, त्यांच्यातल्या चादरी, भिंतीवरच्या खुंट्या आणि फडताळे ह्या सगळ्यांवर तिचा स्टॅम्प आहे. तिथल्या जेवणाला तिच्या हातची चव आहे. नि तिच्या जुनेऱ्याला तिथल्या मसाल्याचा वास आहे… मी जवळ गेले की, त्या वस्तूच मला सांगायच्या… सैरभैर झाले मी…” (पृ. ५३, ५४) या तिच्या बोलण्यावरून नवऱ्याने टाकल्यानंतर सासरहून माहेरी गेलेल्या स्त्रीची अवस्था नेमकी कशी होत असेल, हे लक्षात येते. लग्नाआधी ज्या सहजपणे त्या माहेरी वावरतात तशा घटस्फोटानंतर किंवा सासरच्यांनी त्रास दिल्यानंतर माहेरी गेल्यावर वावरू शकत नाहीत. सासरच्या घरामध्ये, घरातील वस्तूंमध्ये त्यांचा जीव अडकलेला असतो. कारण त्या सर्व वस्तूंना त्यांचा अनेकदा मायेचा स्पर्श झालेला असतो. विभाला माहेरी परक्यासारखे वाटू लागते. म्हणून ती सासरी परत येते.

         त्यासोबत विभाला हा निर्णय घेण्यासाठी अजून एक प्रसंग कारणीभूत ठरतो. पुढे उर्मिला जेव्हा तिला विचारते की सासरी येण्याचा निर्णय तू कसा घेतला? तेव्हा तिने जे उत्तर दिलेले आहे. ते देखील महत्त्वाचे आहे. ती म्हणते, “इथून उठून माहेरी गेले. एक दिवस आईची भांडी बघत होते. अशीच फुरसतीच्या वेळी. माझ्या लक्षात आलं, प्रत्येक भांड्यावर मालती साळवी असं नावाय. पूर्वीच्या भांड्यांवर सौ. मालती विनायक साळवी असं असायचं. मी तिला विचारलं तर म्हणाली, हवंय कशाला सौ.? नि नवऱ्याचा संबंध भांड्याचे पैसे देण्यापुरता. ते नीट वापरणार मी, ठेवणार मी, घासणार पुसणार मी. ते पुसता पुसता माझ्या मायेची पुटं त्याच्यावर चढणार. ह्यात ह्यांचा संबंध येतो कुठे? … तो एकच क्षण. निर्णय घेतला.” (पृ.५७, ५८) या गोष्टींतून विभा व तिची आई या काहीएक प्रमाणात स्वत्त्व प्राप्त झालेल्या स्त्रिया असल्याचे दिसून येते.

         यानंतर विभा ही तिच्या नवऱ्याला ते घर सोडायला सांगते. कारण दुसरे लग्न करून संसार त्याला थाटायचा आहे. तेव्हा घराबाहेर त्याने जावे, अशी भूमिका ती घेते. तिच्या या निर्णयाला तिची सासूसुद्धा साथ देते. दिनेश जेव्हा ती इथे कशी राहते हे मी बघतोच, असे म्हणतो. तेव्हा विभा जे म्हणते ते समस्त स्त्री जीवनावर, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणते, “आई, सांगा त्याला सांगा बाईचा जन्म काय असतो ते. लहानपणापास्नं मुलीला वाढवायचं ते परक्याचं धन म्हणून. सारखं सांगायचं. बाई गं तुला उद्या लग्न करून नवऱ्याच्याच घरी जायचंय, तू इथली नाहीस. तुझं लग्न झालं की आम्ही सुटलो. हे घर तुझं नाही. रुजूच द्यायची नाहीत पोरीची मुळ आपल्या घरी. नि मग एकदाचं लग्न लावून तिची सासरी रुजवात करायची. मला पण असंच वाढवलं आणि या घरी पाठवलं. आता इथे या घरात पूर्णपणे रुजते न रुजते तोच हा माणूस इथून उपटून फेकून देतो आणि सांगतो, पुन्हा रुजव तिथे तुझी मुळ? आई, माझी माती कुठली सांगा?” (पृ.५४, ५५) या आधीही तिचा भाऊ मधु तिला विस्थापित होऊन पुन्हा आयुष्याला सामोऱ्या जाणाऱ्या आदिवासी बायकांचे उदाहरण देतो. तेव्हाही ती हेच म्हणते की, “माझी अवस्था धरणग्रस्तांहून वेगळी नाहीय. मी सुद्धा विस्थापित झालीय मधु” (पृ. ५०) तेव्हा सर्व बायकांना लग्नसंस्थेमुळे एक प्रकारच्या विस्थापनाला सामोरे जावे लागते. वयाची १८-२०-२५ वर्षे त्या जिथे घालवतात, ते माहेर सोडून त्यांना लग्नानंतर सासरी जावे लागते. तिथे सर्वांशी जुळवून घ्यावे लागते. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा, स्वभाव यांना मुरड घालावी लागते. त्यात पुन्हा सासरी त्रास सुरू झाल्यावर किंवा त्यांनी घटस्फोट द्यायचे ठरवल्यावर तिला पुन्हा माहेरीच यावे लागते. त्यामुळे या दोघांपैकी तिचे नेमके हक्काचे घर कोणते आहे, हा प्रश्न पडतो. म्हणून विभा स्वतःची तुलना विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांशी करते.

          जेव्हा ती सासूसह सासरी राहू लागते, तेव्हाही तिच्या सासरच्या नातेवाईकांकडून तिला घटस्फोटीत स्त्री म्हणून उपेक्षा व काही प्रमाणात अवहेलना सहन करावी लागते. सासू, नणंद तिच्या बाजूने असतात. परंतु दिनेशला घराबाहेर काढून, त्याच्या घरावर कब्जा करून  त्याच्यावर विभाने अन्याय केला, अशी जणू इतर नातेवाईकांची भावना असते. विभा, तिची सासू, राणी या जेव्हा मालनच्या (दिनेशची मावसबहीण असावी) लग्नात गेलेले असतात. तेव्हा सगळेजण दिनेशशीच बोलतात, त्याला मिठी मारतात, त्याला जेवायचा आग्रह करतात, त्याला स्वतःमध्ये सामावून घेतात. इकडे विभाशी मात्र कुणी बोलत नाही. ती आई व राणीला सांभाळत चोरट्यासारखी दूर उभी राहिलेली असते. या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटते.

          पुढे उर्मिला दिनेशकडे जाऊ लागते. बऱ्याचदा परस्पर तिकडेच उतरते व नंतर विभाकडे येते. दिनेशला नंदितापासून मुलगा झाल्यावर तिची सासू आठ-दहा दिवस बाळाच्या व बाळंतीण बाईच्या काळजीसाठी तिकडे जाते, तेव्हा विभाला असुरक्षित वाटू लागते. या दोघीही कालांतराने त्यांना सामील होणार का? अशी स्वाभाविक भीती तिला वाटू लागते. परंतु तिकडे जाऊनही आम्ही तुला सोडणार नाहीत, अशी आश्वस्तता त्यांनी दिल्यावर मात्र तिला बरे वाटते.

           तिचा भाऊ मधु हा जेव्हा तिच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ आणतो, तेव्हा ती सुरुवातीला नकार देते. पण तिची सासूसुद्धा जेव्हा आग्रह करू लागते, तेव्हा मात्र ती जी भूमिका घेते, ती पुन्हा एकदा प्रस्थापित पुरुषी व्यवस्थेला धक्का देणारी आहे. ती लग्नासाठी एक अट टाकते. ती अशी की, माझ्याशी लग्न करणाऱ्या पुरुषाने आपलं स्वतःचं घर सोडून इथे या माझ्या घरात राहायला यावं.” (पृ. ९५) या प्रसंगी तिने पुरुषप्रधान व्यवस्थेला, समाजाला जे प्रश्न विचारलेले आहेत, स्त्रियांची जी बाजू मांडलेली आहे, ती खूप महत्त्वाची आहे. ती म्हणते की, “आपली सगळी मुळ छाटून ना. मी इथे दुसऱ्यांदा माझी मुळ रुजवलीयत. आता ती छाटायची नाहीत मला… कुठेही गेलं तरी बाईचं सासर चुकत नाही. का नाही नवऱ्याने आपल्या बायकोच्या घरी राहायचं? त्यालाही कळू दे मागचे पाश तोडून नव्याने रुजण्यातली तगमग. यातना. त्यालाही लावू दे माझ्या घरावर जीव. लावू देत माझ्या माणसांना माया. नवं नातं जोडताना करू दे नवा रहिवास. घेऊ दे नव्या माणसांचा सहवास. माझी ही अट स्वीकारणाऱ्या पुरुषाशी मी लग्नाला तयार आहे.” (पृ. ९६)

         अशा प्रकारे विभा जेव्हा सर्व सुरळीत चालू असते तेव्हा एक चाकोरीत जगणारी स्त्री असते. पण नंतर नवऱ्याने विश्वासघात केल्यावर ती निर्णय घ्यायला लागते, विचार करायला लागते, ठामपणा तिच्यामध्ये येतो, ती जरा स्वतःकडे लक्ष द्यायला लागते. दिनेशला घर सोडायला लावून ती नवऱ्याच्या घरात सासू व मुलीसह राहायला लागते. त्या घरावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करते. त्या घराचे इंटेरियर ती बदलते. तिचे पोतेरं झालेले आहे, असे दिनेश म्हणाला होता. आता ती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करून यायला लागते. संसाराच्या धबडग्यात आपण स्वतःकडे लक्ष दिले नाही, हे तिच्या लक्षात येते. उर्मिला ही अतिशय आधुनिक व मोकळ्या विचारांची असते. तिच्यासोबत ती दिनेशसोबतच्या शारीरिक संबंधांवरपण चर्चा करू लागते. पुढे सासूचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले तेव्हा दिनेशने परस्पर आईकडे काही पैसे दिलेले असतात, ते पैसे ती त्याला परत करते. घराचे राहिलेले पैसेसुद्धा ती दिनेशला परत करते. त्यासाठी कर्ज काढते. म्हणजे ती स्वाभिमानी आहे. भाऊ व सासू तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करतात, स्थळ सुचवतात, तेव्हा ती तिच्याकडे नांदायला येणाऱ्या मुलासोबत लग्न करण्याची भूमिका घेते. यातून परिस्थितीमुळे घडत गेलेली, बदलत गेलेली, पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध फक्त बोलून नव्हे तर कृतीतून भूमिका घेणारी विभा ही व्यक्तिरेखा लेखकाने वाचकांसमोर, प्रेक्षकांसमोर उभी केलेली आहे, असे दिसून येते.

 

डॉ. राहुल पाटील 

मराठी विभागप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *