जयंत पवार – परिचय

            जयंत पवार हे मराठीतील प्रसिद्ध कथालेखक, पत्रकार, नाटककार आणि नाट्यसमीक्षक म्हणून परिचित आहेत. १९८०पासून त्यांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. जयंत पवार यांची ‘वंश/ पाऊलखुणा’ (अभिनव प्रकाशन), ‘अधांतर’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (शब्द पब्लिकेशन), ‘लिअरने जगावंकी मरावं?’ (पंडित पब्लिकेशन) ‘माझं घर’ शब्दालय प्रकाशन) इ. नाटके प्रकाशित आहेत. त्यांनी एकांकिका लेखनही केलेले असून ‘नाद’

, ‘निनाद’, ‘पडसाद’, ‘दरवेशी’, ‘मेला तो देशपांडे’, ‘कार्य सिद्धीस नेण्यात श्री (अ)समर्थ आहे’, ‘दुजा शोक वाहे’, ‘लियर’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे,’ ‘विठाबाईचा कावळा’, ‘जळिताचा हंगाम’ इ. २३ एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी कथा व वैचारिक साहित्यही लिहिलेले आहे.

जयंत पवार यांच्या ‘अभी रात बाकी है’ हा ‘अधांतर’ या नाटकाचा हिंदीत अनुवाद कैलाश सेंगर यांनी केला असून वाणी प्रकाशनाने तो २०१० साली प्रकाशित केलेला आहे. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

              जयंत पवार यांचे ‘माझं घर’ हे नाटक डिसेंबर १९९९मध्येच रंगभूमीवर आले होते व या नाटकाचे एकूण २२० प्रयोग झाले होते. अमेरिकेतही या नाटकाचे काही प्रयोग झाले होते. मात्र पुस्तक स्वरुपात हे नाटक खूप उशिरा म्हणजे फेब्रुवारी २०२२मध्ये जयंत पवार यांच्या इच्छेनुसार शब्दालय प्रकाशनाने त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित केले. संध्या नरे-पवार यांच्या मते, “जयंतच्या प्रखर सामाजिक नाटकांमध्ये हे नाटक कौटुंबिक म्हणून काहीसं दुर्लक्षित राहिलं, त्यातील विद्रोही स्त्रीवादी मांडणी कमी जणांच्या लक्षात आली. अगदी स्त्रीवादी चळवळीतही त्याची फारशी चर्चा झाली नाही.” (‘माझं घर’, मनोगत, पृ. ८) यावरून जयंत पवार यांची इतर नाटके ही प्रखर सामाजिक विषयांवरची आहेत. मात्र ‘माझं घर’ या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा, त्यांचा संघर्ष, या नाटकातील संवाद, घटनाप्रसंग, कथानक इ. अभ्यासल्यावर आपल्या असे लक्षात येते की, हे नाटक सुद्धा सामाजिक प्रश्नावरीलच असून यात स्त्रियांच्या विस्थापनाची समस्या लेखकाने मांडलेली असून यातील विभा ही वरवर साधी गृहिणी, नोकरदार वाटणारी स्त्री जी भूमिका घेते, ती प्रस्थापित पुरुषी व्यवस्थेला आव्हान देणारी व विचारप्रवृत्त करणारी आहे. या नाटकात विभा, आई (दिनेशची आई, विभाची सासू), मालती साळवी, उर्मिला, राणी, नंदिता मुर्डेश्वर या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. यातील प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा ही काही अंशी समाजातील सर्वसाधारण स्त्रियांसारख्या वाटत असल्या तरी खूप वेगळ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *