उर्मिला ‘माझं घर’ या नाटकातील व्यक्तिरेखा

           उर्मिला ही दिनेशची बहीण व विभाची नणंद आहे. ती एम. एस्सी झालेली असून कोल्हापूरला नोकरी करते. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली आहे. शिकून मुंबई सोडून लांब कोल्हापूरला नोकरीसाठी जाण्याच्या तिच्या निर्णयाला तिची आई व भावाचाही विरोध असतो. पण ती ठाम असते व तिच्या वहिनीचा म्हणजे विभाचा मात्र तिला पाठिंबा असतो. उर्मिलाचे विभाशी अतिशय घनिष्ठ संबंध असतात. ती विभाची नणंद असूनही तिच्याशी बहिणीप्रमाणे किंवा एखाद्या चांगल्या मैत्रिणीप्रमाणे वागत असते. तिचा भाऊ

विभाला घटस्फोट द्यायचे ठरवतो, याचे तिला खूप दु:ख होते. ती भावाला समजावते, पण तो ऐकत नाही. पुढे त्याने दुसरे लग्न केल्यावर त्याच्या बायकोच्या पोटात ट्युमर होतो, तेव्हा तिची आई जायला तयार होत नाही. मात्र उर्मिला जाते. दिनेशला नंदितापासून मुलगा होतो, तेव्हाही ती जाते. पण तिचे विभाशीच जास्त घनिष्ठ संबंध असतात.

                तिचे वय तिशीच्या पुढे आहे. मात्र तिने अजूनही लग्न केलेले नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत विवाहसंस्था ही स्त्रियांच्या हिताची नाही, असे तिचे मत आहे. ती म्हणते की, “माझा लग्नाबिग्नात विश्वास नाही. कारण पण तुम्ही. लग्न करणारी माणसं ह्या सिरियस गोष्टींचा चुथडा करून टाकता.” (पृ. ३६) ती तारुण्यात ऋषिकेशसोबत रिलेशनमध्ये होती. त्याच्यासोबत तिचे फिजिकल रिलेशन नव्हते तर इमोशनल जास्त होते. प्रेम, त्यातील आनंद, संबंध तुटल्यानंतर होणारा त्रास या गोष्टी तिने सहन केलेल्या असतात. पण तिच्या मते त्या त्रासानेच ती मानसिक व भावनिकदृष्ट्या मॅच्युअर झालेली असते. तिच्यात उथळपणा राहिलेला नसतो.

               वयाच्या तिशीनंतर ती विकासच्या संपर्कात येते व त्याच्यासोबत शारीरिक संबंधदेखील ठेवते. अनेकदा तो तिच्याकडे राहतो व सकाळी त्याच्या कामाला जातो. तिच्या मते, “लग्न आणि शरीरसंबंध ह्या दोन गोष्टी स्वतंत्रपणे बघता येतात. उलट लग्नाआधी हा अनुभव घेतला की खूप बरं असतं. बऱ्याच गोष्टी उमजून येतात. सेक्स आनंद मिळविण्यासाठी घ्यायचा असतो. आय एंजॉय इट.” ‘त्याने उद्या लग्नाला नाही म्हटलं तर…’ असे विभा तिला विचारते. तेव्हा ती म्हणते की, “तर काय? त्याने काही माझ्यावर बलात्कार केलेला नाही. मी स्वतःहून त्याला रात्री थांबायचा आग्रह केला, एके दिवशी. मग दुसऱ्या दिवशीही. मग अधूनमधून. नंतर वरचेवर सुख आपल्या इतकं जवळ, आपल्यातच असताना ते शोधायला बाहेर कशाला जायचं? … उद्या तो नाही म्हणाला तर त्याचा तो. पण ते सुख देण्याघेण्याचे क्षण तर मी आसुसून जगलेय ना. ते तर नाही कोणी हिरावून घेत माझ्यापासून. माझ्यासाठी तो क्षण खरा.” (पृ. ५८) अशी त्या त्या क्षणाचा विचार करणारी व बिनधास्त जगणारी, लग्न, शारीरिक संबंध या बाबतीत इतर स्त्रियांपेक्षा वेगळा विचार करणारी, नव्हे जगणारी अशी ही उर्मिला आहे. ती खूप बिनधास्त व मोकळ्या स्वभावाची आहे. हे सर्व सहज चर्चेत ती स्वतः विभाला सांगते. पुढे ती विभाला विकास सोबतच्या शारीरिक संबंधांचेसुद्धा वर्णन करून सांगते. तिच्या मते, अशा गोष्टींच्या संदर्भात सहजपणे आपल्या माणसाकडे बोलावं. बायकांचे इथेच वांधे होतात. त्या झाकू नये ते झाकतात आणि नको त्या गोष्टी सांगत बसतात.

               उर्मिला वाचनही करते, असे तिच्या बोलण्यातून दिसून येते. तिच्या मते, विभा जे ‘धागेदोरे’ नावाचे एका लेखिकेचे आत्मचरित्र वाचत आहे, त्यात जगाला मोठा वाटणारा आपला नवरा, नवरा म्हणून किती खोटा आहे, हे सांगण्यासाठी ती संपूर्ण पुस्तक खर्ची घालते. परंतु ती दोघांच्या नात्याच्या मुळाशी जात नाही. दोघांचं सेक्शुअल लाईफ कसं होतं, हे सांगत नाही. एवढं सर्व सांगतात तर मग मराठी लेखिका नवरा बायकोच्या नात्यातील ही एवढी महत्त्वाची गोष्ट का लपवून ठेवतात? तिच्या मते, “अनेकदा दोघातलं सेक्शुअल रिलेशनच त्यांच्यातल्या विसंवादाला कारणीभूत असतं. पण त्यांची चर्चा ह्या आत्मचरित्रात कधीच नसते. पुरुषांची आत्मचरित्र मी वाचतच नाही. कारण ते संभावित असतातच. पण बायकाही काही झाकपाक करण्यात कमी पटाईत नसतात!” (पृ. ६०) तिच्या या सर्व मतांवरून ती अतिशय आधुनिक विचारांची असल्याचे दिसून येते. ती मुंबईसारख्या महानगरात लहानाची मोठी झालेली आहे, उच्चशिक्षित आहे. तसेच ती घरापासून लांबच्या शहरात नोकरी करते, एकटी राहते, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे, वाचते. या सर्व गोष्टींमुळे तिची स्वतःची अशी मते तयार झालेली आहेत. ती अशा पद्धतीने जगणाऱ्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते.

 

डॉ. राहुल पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *