‘माझं घर’ या नाटकातील दुय्यम व्यक्तिरेखा

               विभा, आई, उर्मिला यांच्या व्यतिरिक्त या नाटकात विभाची मुलगी राणी, नंदिता मुर्डेश्वर व विभाची आई मालती साळवी या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. राणी ही आठ-दहा वर्षाची लहान मुलगी आहे. ती शाळेत जाते. आई व वडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाचा फटका तिला बसलेला आहे. ती आईकडे राहते, परंतु नंतर वडिलांचा सहवासदेखील तिला हवाहवासा वाटतो. त्यासाठी ती वडिलांचा पत्ता तिच्या शाळेतील मुलाच्या माध्यमातून 

मिळवण्याचा प्रयत्न करते. तिचे वडील व नंदिता तिला शाळेत भेटायला येतात, ते ती आईला सांगत नाही. वडील तिला कलर बॉक्स देतात. ते वर्गातील मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या वडिलांनी सर्वांना दिले असे आईशी खोटं बोलते.

            नंदिता या नाटकात प्रत्यक्ष कोणत्याही प्रवेशात येत नाही. तिचा एकही संवाद या नाटकात नाही. परंतु तिचा उल्लेख अनेक ठिकाणी होतो. ती एक कलावंत आहे. मुंबईतील जहांगीर आर्टमध्ये तिच्या कलेची दोन प्रदर्शने प्रदर्शित झालेली आहेत. ती टिपिकल साऊथ इंडियन स्त्रीसारखी आहे. कपाळावर मोठा कुंकू लावते. ती दिनेशच्या संपर्कात येते व त्याच्या प्रेमात पडते. पुढे ती त्याच्याशी लग्नकरते. तिच्यासाठी दिनेश विभापासून घटस्फोट घेतो. या गोष्टीबद्दल नंदिताला अपराधी वाटत राहते. लग्नानंतर ती दिनेशला धाकात ठेवते. त्याची सर्व एक्स्ट्रा कामे बंद करून टाकते. विभासोबत असताना उशिरा येणारा दिनेश आता रात्री आठच्या आत घरी येतो व जी कामे असतील ती घरीच करतो. अर्थात हे सर्व दिनेश व उर्मिला यांच्या तोंडी वेगवेगळ्या वेळी जे संवाद आलेले आहेत. त्यातून वाचकांना कळते.

           मालती साळवी या विभाच्या आई आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला विभाच्या बोलण्यातून कळते. त्या थोड्याशा पुरुषप्रधान व्यवस्था ओळखून एक साधा निर्णय घेतात. ज्यामुळे विभा पुढे बदलते. तो म्हणजे, लग्नानंतर काही वर्षे त्या भांड्यांवर ‘सौ. मालती विनायक साळवी’ असे पूर्ण नाव लिहायच्या. परंतु नंतर त्या फक्त ‘मालती साळवी’ असे लिहायला लागतात. विभा त्यांना याबद्दल विचारते, तेव्हा त्या म्हणतात की, “हवंय कशाला सौ.? नि नवऱ्याचा संबंध भांड्यांचे पैसे देण्यापुरता. ते नीट वापरणार मी, ठेवणार मी, घासणार पुसणार मी. ते पुसता पुसता माझ्या मायेची पुटं त्याच्यावर चढणार. ह्यात ह्यांचा संबंध येतो कुठे?” (पृ.५७, ५८) म्हणजे जरी पैसा नवरा खर्च करत असला तरी नंतर त्याची देखभाल, स्वच्छता, त्यासाठीचे श्रम हे त्यांचे असतात. याची जाणीव ही विभाच्या आईला होते. तिच्यापासून प्रेरणा घेऊनच मग विभा सासरी परत येते व नवऱ्याच्या घरावर स्वतःचा हक्क सांगते. कारण इथेही घर जरी नवऱ्याच्या नावावर असले, त्या घरावरची नेमप्लेट जरी त्याच्या नावाची असली, तरी त्या घराला घरपण प्राप्त करून देण्यासाठी, ते घर टिकवून ठेवण्यासाठी श्रम हे विभाने घेतलेले असतात.

          अशा पद्धतीने या नाटकातील जवळपास सर्व स्त्रिया या काहीएक प्रमाणात पुरुषप्रधान व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, त्या व्यवस्थेविरुद्ध कृती करणाऱ्या, त्या व्यवस्थेला पर्याय देणाऱ्या आहेत. हेच या नाटकाचे मोठे यश आहे.

 

डॉ. राहुल पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *