खाजगीकरण, कंत्राटीकरण का?

बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर शिकून सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरू लागला, स्वतःची व समाजाची प्रगती साधू लागला. हळूहळू तो IAS, IPS, न्यायाधीश अशा महत्त्वाच्या पदांवर जाऊन निर्णय प्रक्रियेत गेला असता. मग त्यांना या विकासाच्या मार्गापासून दूर कसे न्यायचे? तर आधी रथयात्रा, मग बाबरी मशीदपतन, मग ‘बनायेंगे मंदिर’ची चिथावणी, मग २००५नंतर पेन्शन बंद, मग पदभरती बंद, शाळांचे खाजगीकरण, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, त्यात आरक्षण नाही, नवीन शैक्षणिक धोरण, यामुळे

हळूहळू सर्व वाटा बंद करणे, पुन्हा हे सर्व लक्षात येऊ नये म्हणून धर्म, मंदिरे, देवदेवता, शिवपुराण, हिंदुराष्ट्र, सण-उत्सवांचे मुद्दामहून वाढवलेले स्तोम. तर अशी ही वस्तुस्थिती आहे.

तुम्ही खड्ड्यात जावे, पुन्हा बळीराजाप्रमाणे पाताळात जावे म्हणून रचलेले हे दुष्ट कारस्थान आहे. हे एक चक्रव्यूह आहे. खरंतर या चक्रव्युहाला भेदणे खूप सोपे आहे. पण त्यासाठी धर्मभावना व देव या गोष्टी खूप वैयक्तिक ठेवाव्या लागतील व ज्ञानसंपादनाचा प्रचंड मोठा ध्यास घ्यावा लागेल. तरच आपण या आव्हानाला तोंड देऊ शकतो. हे एकट्या दुकट्याने करून चालणार नाही (ते तर कराच) पण एक समाज म्हणून हे कारस्थान आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे.

चीनमध्ये ज्याप्रमाणे अफूचे व्यसन लावून चीनला कमकुवत केले गेले होते, तसे हे देवाधर्माची नशा वाढवून सुरू आहे. यात ना आध्यात्मिक प्रगती आहे, ना मानसिक शांतता आहे, ना भौतिक प्रगती. आहे फक्त मागासलेपण व प्रगतीच्या मार्गावरून पुन्हा बाजूला जाणे. यांची मुले शास्त्रज्ञ, इंजिनीयर, राजकीय नेते, न्यायाधीश, IAS, IPS, सेक्रेटरी, अभिनेते, खेळाडू, मोठ्या कंपन्यांचे सीईओ बनून कोट्यवधी रुपये कमवत आहेत, अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली हे त्यांचे शहर आहे व आपण इथे ज्ञानसंपादन, त्यासाठीचे झपाटलेपण सोडून देऊन धर्मरक्षण, संस्कृतीरक्षण या नावाखाली स्वतःचा सत्यानाश करून घेत आहोत. सांगणे आमचे काम आहे. बाकी तुम्ही ठरवा.

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *