द्वेष : लक्षणे, परिणाम व उपचार

द्वेष हा असा मानसिक विकार आहे जो माणसाचा विवेक, सारासार विचार करण्याची, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, जवळचा-लांबचा हे ओळखण्याची क्षमता नष्ट करून टाकतो. तो माणसाच्या मनाची अंतर्गत मोडतोड करून टाकतो. अशी व्यक्ती

स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसते. आपण काय बोलत, करत आहोत, त्याचे काय परिणाम होतील, त्याचा स्वतःला किंवा इतरांना त्रास होत असेल, आपल्या अशा वागण्याने आपली नेमकी कोणती प्रतिमा तयार होत आहे, झाली आहे हे त्या व्यक्तीला कळत नाही. तिला नेहमी असुरक्षित वाटत राहते. लोकं आपल्याविरूद्ध कारस्थाने करत आहेत, असे तिला नेहमी वाटत राहते. अशी व्यक्ती एकटी पडत जाते. ही व्यक्ती ज्यांचा द्वेष करते, त्यांच्यापासून लांब राहणाऱ्या व्यक्ती चांगल्या असोत की वाईट त्या याला जवळच्या वाटू लागतात. काही परपोषी व्यक्ती अशा द्वेष करणाऱ्या व्यक्तींच्या एकटेपणाचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी, अनेक लहान सहान कामे करण्यासाठी, व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी करून घेतात. त्या अशा व्यक्तीला जगापासून, इतरांपासून तोडून टाकतात. अशी व्यक्ती मग नकारात्मक, शीघ्रकोपी व बऱ्याचदा आजूबाजूच्या व्यक्तींसाठी, व्यवस्थेसाठी विघातक बनत जाते. मग ती व्यक्ती किती का उच्चशिक्षित असेना, द्वेष भावना ही तिला माणसांतून उठवते. विशेष म्हणजे आपल्या बाबतीत आपल्यामुळेच वाईट घडते आहे, हे तिला कळत नाही. याचा आरोपदेखील ती ज्यांचा द्वेष करते त्यांच्यावर करत राहते. ती सूड घेऊ पाहते. स्वतःही आनंदी, सुखी राहत नाही व इतरांनाही मानसिक त्रास देते.

त्यामुळे द्वेषभावनेला आपल्या मनात आधीपासून थारा देता कामा नये. सर्वांसोबत मिळून मिसळून राहावे. चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे. मनातील विचार, भावना योग्य व्यक्तींपाशी बोलून मोकळे व्हावे. मनात ठेवल्याने त्या कुजतात व त्याच पुढे त्रासदायक ठरत जातात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असलेला आनंद घ्यावा. अहंकार सोडून ज्यांच्यासोबत आपण चांगले दिवस घालवलेले असतील त्यांना जपावे. मध्ये मध्ये आत्मपरीक्षण करावे व आपल्याला यातून बाहेर पडणे शक्य होत नसेल तर बेलाशकपणे मानसोपचार तज्ज्ञांना जाऊन भेटावे व त्यांची मदत घ्यावी. कारण जसे शरीराचे आजार, जखमा असतात व त्यासाठी डॉक्टर असतात. तसेच मनाच्या बाबतीत असते. ते आपल्याला यातून समुपदेशन व योग्य औषधोपचार करून बरे करू शकतात. पण त्यासाठी आपण मनाने आजारी आहोत, हे मान्य करणे गरजेचे असते.

– डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *