भारत-पाक फाळणी व सद्यपरिस्थिती

१९३७पर्यंत मोहम्मद अली जिना व इतर यांच्या अजेंड्यावर भारत-पाक फाळणी, पाकिस्ताननिर्मिती इत्यादी मुद्दे नव्हते. पण पुढील ७-८ वर्षात त्यांनी व इथल्या धर्मांध संघटनांनी एवढा धार्मिक उन्माद माजवला की दहा वर्षात देशाचे तुकडे झाले. दोन्ही-तिन्ही धर्मांची मिळून ४०-५०लाख लोकं दंगलीत मारली गेली. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. लहान मुले, म्हातारे, स्त्रिया व

सर्वांनाच प्रचंड हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. दहा वर्षात देशाचे होत्याचे नव्हते झाले.

त्याचप्रमाणे २०१४च्या आधी तेव्हाची पिढी २०२०पर्यंत भारताला महासत्ता बनवायचे स्वप्न पाहत होती. प्रत्येक जण या विचारांनी भारलेला होता. पण २०१४पासून ते आता नऊ वर्षांमध्ये हे स्वप्न मागे पडले आहे. आता आपण धर्मराष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहू लागले आहोत. प्रत्येक जण कट्टर जातीयवादी, धर्मांध बनत चाललेला आहे. धर्मांधता, जातीयता इतकी टोकाला पोहोचली आहे की आज प्रत्येक आठवड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या शहरामध्ये ताणतणाव निर्माण होत आहेत. ‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून, अनेक बाबा बुवा यांची धार्मिक प्रवचने, विधाने यातून या गोष्टींना खतपाणी घातले जात आहे. काही पक्ष, ‘संघ’टना या प्रकारांना प्रोत्साहन व संरक्षण देत आहेत.

ही आपली भविष्याकडे वाटचाल नाहीये. तर मध्ययुगाकडे वाटचाल सुरू आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपली मुलं, मुली अशा वातावरणामध्ये सुरक्षित राहू शकत नाहीत. केव्हा, कुठे दंगल होईल व त्यात कोण बळी पडेल हे आपण आज सांगू शकत नाहीत. आपणच पेटवलेली ही आग आपला संसार उद्ध्वस्त करू शकते, हे रोखणे गरजेचे आहे.

आपला विवेक, सामाजिक शहाणपण यांची या काळात कसोटी लागणार आहे. अतिशय शांतपणे विचारपूर्वक आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. या विध्वंसक शक्तींना आपल्याला हरवावे लागणार आहे.

तरच लाखो क्रांतिकारकांनी बलिदान देऊन स्वतंत्र झालेला व शेकडो समाजसुधारक, संत यांनी आपले विचार शिंपून उभा केलेला हा देश शाबूत राहील.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीमध्ये एक गीत लिहिले गेले होते. ‘हम लाये हे तुफान से कश्ती निकाल के। इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के।’ हे लक्षात ठेवावे लागेल.

डॉ. राहुल पाटील

(पुढील लिंकवर क्लिक करून माझा ‘पाकिस्तान निर्मितीची घटना व परिणाम’ हा शोधनिबंध नक्की वाचा. https://drrahulrajani.com/%e0%a5%a7%e0%a5%af%e0%a5%ad%e0%a5%ab-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a5%a7%e0%a5%af%e0%a5%ad%e0%a5%ab-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *