ब्लॉगलेखन

एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच

मक्तेदारी न राहता सामान्य माणसंही त्यांचा वापर करू लागले आहेत. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची ओळख निर्माण करण्याची, स्वतःची नाममुद्रा उमटवण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्वत:चे संकेतस्थळ, Facebook account/ page, Twitter, Instagram यांच्या वापरातून अनेकांनी स्वतःचा एक अनुयायी वर्ग (Followers) निर्माण केला आहे. यांसारखेच ‘ब्लॉग’ हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याला ‘अनुदिनी’, ‘जालपत्रिका’ किंवा ‘जालनिशी’ ही नावेही वापरली जातात. मात्र ‘ब्लॉग’ हे नाव अधिक परिचित आहे.
ब्लॉग हे आपली मते, भावना व्यक्त करण्याचे एक डिजिटल माध्यम आहे. ब्लॉगच्या माध्यमातून आपले विचार, भावना मते मांडण्यासाठी आपल्याला कुणाचीही अनुमती घेण्याची आवश्यकता नसते. ब्लॉगवर प्रकाशित केलेले लगेच सर्वांसाठी आंतरजालावर उपलब्ध होत असते. त्या पोस्टची लिंक तयार करून आपण ती Facebook account/ page, Twitter, Instagram, whatsapp अशा कोणत्याही समाजमाध्यमावर टाकू शकतो. त्यावर टिचकी मारून (क्लिक करून) ती वाचकाला वाचता येते. प्रस्तुत लेखकाचा drrahulrajani.com नावाचा ब्लॉग असून त्याला आतापर्यंत ७७००० जणांनी बघितले आहे.
ब्लॉग : संकल्पना व स्वरूप-
“ब्लॉग’ हे ‘वेबलॉग’ या शब्दाचे लघुरूप आहे. वेब (Web) म्हणजे आंतरजाल आणि लॉग (Log) म्हणजे नोंद होय. वेबसाईट आणि लॉग बुक यांचे मिश्रण म्हणजे ब्लॉग असून ते डायरी लेखनाचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावेत या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले ‘संकेतस्थळ’ म्हणजे ब्लॉग” (मराठी युवकभारती, इयत्ता अकरावी, पृ. १०८) , अशी ब्लॉगची व्याख्या करता येईल.
आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून ब्लॉगलेखन करता येते. ब्लॉगलेखन हे सामाजिक संपर्कस्थळ असल्याने त्यावर प्रसिद्ध होणारी माहिती अनेक वाचकांना उपयुक्त ठरू शकते.
ब्लॉगच्या शोधाच्या आधी डायरी लेखन केले जायचे. आज सुद्धा ज्यांना ब्लॉग या माध्यमाबद्दल माहिती नाही. ते आपले विचार फक्त आपल्या वैयक्तिक डायरीत लिहून ठेवतात. डायरी ही खाजगी स्वरुपाची असते. डायरीत लिहिताना आपण आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक घडामोडींवर भाष्य करतो. जीवनातील विविध अनुभवांतून आपण काय शिकलो, हे आपण डायरीत लिहून ठेवतो. परंतु हे खाजगी स्वरूपाचे असल्याने अनेकांपर्यंत जात नाही. ते अनेकांपर्यंत जावे, इतरांना देखील त्याचा लाभ घेता यावा, यासाठी एका माध्यमाची गरज होती. या गरजेतूनच ब्लॉगची निर्मिती झाली. यासाठी ब्लॉग हे एक उपयुक्त असे माध्यम ठरले आहे.
मनात आलेले विचार व भावना यांना शिस्त व स्वातंत्र्याची जोड देऊन विविध विषयांवर ब्लॉगलेखन करता येते. ब्लॉगवर आपण जे लिहित असतो ते महाजालावर (इंटरनेट) प्रकाशित होते. म्हणून ब्लॉगच्या वाचकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.
ब्लॉगचा इतिहास-
जस्टीन हॉल हा पहिला ब्लॉगर मानला जातो. १९९४ मध्ये links.net ही वेबडायरी त्याने सुरू केली. जॉन बर्गर याने ‘ब्लॉग’साठी ‘वेबलॉग’ या शब्दाचा प्रयोग केला होता. असे मानले जाते की, १९९९ मध्ये पीटर मेरहोल्स याने ‘ब्लॉग’ या शब्दाला व्यवहारात प्रस्थापित केले. भारतात २००२ नंतर ब्लॉग लेखन सुरू झाले. अशा पद्धतीने ब्लॉगला अभिव्यक्तीच्या नव्या माध्यमाच्या रूपात मान्यता मिळाली. सुरुवातीला मर्यादित प्रमाणात असलेला ‘ब्लॉग’चा वापर हळूहळू वाढत गेलेला असून आज हे एक लोकप्रिय माध्यम मानले जाते.
अनुदिनी (ब्लॉग) ची क्षेत्रे, विषय –
ब्लॉग’ हे माध्यम सुरुवातीला वैयक्तिक अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झाले होते. पण नंतरच्या काळात त्याची उपयुक्तता व लोकप्रियता लक्षात आल्यावर त्याचे कार्यक्षेत्र विस्तारत गेले. आज जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांशी संबंधित मजकूर आपल्याला ब्लॉगवर मिळत असतो. ब्लॉगला मानवी जीवनाशी संबंधित कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. तरीही प्रातिनिधिक स्वरूपात ब्लॉगशी संबंधित पुढील काही क्षेत्रे सांगता येतात.
१) वैयक्तिक, २) सामाजिक, ३) व्यावसायिक, ४) वाङ्‌मयीन, ५) सामुहिक, ६) पर्यटन, ७) शैक्षणिक, ८) राजकीय, ९) माहिती-तंत्रज्ञान, १०) शासकीय योजनांची माहिती, ११) क्रीडा, १२) मालिका, चित्रपट, इ. या क्षेत्रांशिवाय इतर क्षेत्रांमध्येही ‘ब्लॉग’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
वरील सर्व क्षेत्रांतील विविध विषयांवर आपण ब्लॉग लिहू शकतो. ब्लॉग लेखनासाठी असे व्यापक क्षेत्र आपल्यासमोर उपलब्ध असते. असे असले तरी प्रत्येकाचे आवडीचे क्षेत्र वेगवेगळे असते. कुणाचे एकापेक्षा जास्त विषयांमध्ये प्राविण्य असते, प्रभुत्त्व असते. तेव्हा आपली आवड, प्राविण्य या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या विषयांवर ब्लॉग लिहायला सुरुवात केली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या विषयावर लोकांना वाचायला आवडते, लोकांच्या जगण्याशी संबंधित गोष्टी अशा विषयांचा अभ्यास करून, त्या ठिकाणांना भेटी देऊन त्या विषयावर लिहिले तर ब्लॉग लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. आपल्या घरातील लहानग्यांना लहानपणापासून वाचनाची, लेखनाची सवय लावली तर ते भविष्यात एक चांगले ब्लॉगर म्हणून नावारूपास येऊ शकतात.
ज्यांना यूट्यूबच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल त्यांनादेखील ब्लॉगलेखन उपयुक्त ठरू सहकाते. कारण ब्लॉगवरील लेखनामुळे आपल्याकडे मुद्रित स्वरुपात एक स्क्रिप्ट असते. यूट्यूबवर आपल्याला काय व कसे सदर करायचे आहे, त्याची एक मुद्रित स्क्रिप्ट आपल्याकडे असल्यामुळे आपले व्हिडीओ अभ्यासपूर्ण होऊ शकतात व आपण तिकडेही यशस्वी होऊ शकतो.
नवीन ब्लॉगर्सला सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. पण नंतर सवयीने एकेका अडचणीवर मात करत चांगले ब्लॉगलेखन करता येते. ज्याला सातत्याने लिहायची सवय आहे, त्याला फार अडचणी येत नाहीत. आपण जे लिहून मुद्रित केलेले असते. तेच कॉपी करून ब्लॉगमध्ये टाकता येते.
आज महाराष्ट्रात, भारतात किंवा जगात अनेक ब्लॉगर्स आहेत की ज्यांचा ब्लॉगलेखन हाच व्यवसाय आहे. यातून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. काहीजण तर महिन्याला लाखो व वर्षाला कोट्यावधी रुपये ब्लॉगलेखनाच्या माध्यमातून कमवत असतात. उदा.-
अमित अग्रवाल – Labnol.org- २ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न
हर्ष अग्रवाल – ShoutMeLoud – १.५ ते २ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न
दीपक कनकराजू, प्रीतम नागरले, प्रदीप कुमार अशी अजून इतर नावे सांगता येतील.
चांगल्या ब्लॉगची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता अकरावीच्या पुस्तकात चांगल्या ब्लॉगची जी वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ती अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ती पुढीलप्रमाणे
आकर्षक शीर्षक
आकर्षक विषय मांडणी
छोटी, सुटसुटीत, सोपी आणि आकलनसुलभ अशी वाक्यरचना
परिच्छेदांची समर्पक मांडणी
एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहजशैली
रिकाम्या जागेचा योग्य वापर (Use of White Space)
वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली
संवादात्मक लेखन
समूहाशी नाते बांधणारी शैली
विविध श्राव्य, दृक् -श्राव्य फितींची लिंक
शब्दमर्यादेचे पालन
विषयातील अद्ययावतता
या गोष्टींचा सराव केला, आपल्या लेखनात वरील वैशिष्ट्ये आणली, त्यासाठी मेहनत घेतली तर नक्कीच चांगले ब्लॉगलेखन करता येते.
ब्लॉग कसा तयार करावा?
ब्लॉग तयार करण्यासाठी आपले स्वत:चे Google मध्ये Gmail अकाऊंट असणे गरजेचेआहे.
Google Chrome/ Microsoft edge किंवा Mozila Firefoxमध्ये www.blogger.com संकेतस्थळ उघडा.
‘CREATE YOUR BLOG’ वर क्लिक करा.
आपले Gmail : Google अकाऊंट पासवर्ड ने log in करा.
पुढील पेजवर Choose a name for your blog. This is the title that will be displayed at the top of your Blog असे येते. title (शीर्षक) द्यावे. त्यानंतर Nextवर क्लिक करून पुढे जावे.
तिथे Choose a URL for your blog-This web address is how people will find your blog online असा पर्याय येतो. त्याखाली ……………… blogspot.com असे येते. त्या रिकाम्या जागेत विषय/ आपले/ कंपनीचे नाव वगैरे टाकून blogger address तयार करावा. उदा.- drrahulrajani.blogspot.com
यानंतर तुमचा ब्लॉग तयार झालेला असेल. यावर तुम्ही डाव्या बाजूला वर New Postवर क्लिक करून तुमचा लेख, कविता किंवा अजून काही पोस्ट टाकू शकता. त्या पोस्टमधील तपशीलाचा आकार, रंग या सर्व गोष्टींच्या सेटिंगसाठी तिथे अनेक पर्याय असतात. त्यांचा वापर करून आपण आपली पोस्ट आकर्षक करू शकतो. याशिवाय आपण आपल्या ब्लॉगवर यूट्यूब, इतर ब्लॉग, संकेतस्थळ यांच्या सक्रीय लिंकसुद्धा टाकू शकतो. जेणेकरून त्यावर क्लिक करून वाचक त्या माहितीच्या स्त्रोतापर्यंत पोहचू शकतो.
वर जी प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे. ती google या platform वर ब्लॉग कसा तयार करायचा या संबंधीची आहे. याशिवाय wordpress या platformवरही ब्लॉग तयार करता येतो. Blogger व Word press या दोन्हीही content management system आहेत. या पैकी कशावरही आपण आपला ब्लॉग तयार करू शकतो.
आपल्याला जर ब्लॉग सुरू करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर युट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमातून अथवा गुगलवर लेखांमधून ही प्रक्रिया समजावून सांगितलेली असते. त्यांचा वापर करता येतो किंवा मग या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेता येते.
ब्लॉगलेखन करताना पाळायची पथ्ये-
ब्लॉगलेखन हे महाजालावर प्रकाशित होत असल्याने ते एकाच वेळेस अनेकांपर्यंत पोहचत असते. त्याचे वाचकही विविध क्षेत्रातले, वयोगटातले असतात. म्हणून ब्लॉगलेखन करताना पुढील काही पथ्ये पाळली गेली पाहिजेत.
ब्लॉगलेखन करताना सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयांवर लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे आवश्यक आहे.
एखादी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर टीका, आरोप करणारा, त्यांची बदनामी करणारा मजकूर पुरावा असल्याशिवाय सहसा लिहू नये. अन्यथा ब्लॉगलेखक अडचणीत येऊ शकतो.
ब्लॉग वाचून त्यावर वाचकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता/ तयारी असावी.
आपल्या ब्लॉगमधील विचारांमुळे समाजस्वास्थ्य, शांतता व सुव्यवस्था यांना हानी पोहचेल असे विचार मांडू नयेत.
मराठीतील काही महत्त्वाचे ब्लॉग्ज-
kavitamahajan.wordpress.com – कविता महाजन (कादंबरीकार)
http://blog.praveenbardapurkar.com – प्रवीण बर्दापूरकर (पत्रकार, संपादक)
drrahulrajani.com – डॉ. राहुल पाटील
https://blog.mygov.in/

अशा रीतीने ब्लॉगलेखनाच्या माध्यमातून चांगले करियर करता येणे, स्वत:ची एक ओळख निर्माण करणे शक्य आहे. पण त्यासाठी सुरुवात करण्याची व सातत्याने नवीन शिकत राहण्याची व लिहित राहण्याची गरज आहे.

डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *